Join us

एकच वार आणि जागेवर ठार! शरद केळकरचा 'रानटी' लूक; या तारखेला होणार सिनेमा रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:33 PM

सध्या मराठी मनोरंजनविश्वात अभिनेता शरद केळकरच्या आगामी 'रानटी' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Raanti movie : समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' (Raanti movie) हा मराठीतील अ‍ॅक्शनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'रानटी' मधून प्रेक्षकांना 'न्यू अ‍ॅंग्री यंग मॅन'च्या रुपात अभिनेता दिसणार आहे.

जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात. पण तेथील सगळेच प्राणी ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. अशाच एका हटके विषयावर 'रानटी' चित्रपटाचं कथानक आधारलेलं आहे. रानटीच्या माध्यमातून शरद केळकरचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. त्या पोस्टरने सिनेरसिकांचं लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेता रानटी सिनेमात 'विष्णू' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. 

एकंदरीत 'रानटी च्या पोस्टरवरून हा चित्रपट अॅक्शन सीन्सने परिपूर्ण असणारं आहे. बॉलिवूडमध्ये व्हिलन साकारून अभिनेता शरद केळकरने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे या मराठी चित्रपटातून त्याचा 'रानटी'पणा प्रेक्षकांना किती पंसतीस उतरतो  हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 'धारावी बॅंक', 'इंदोरी इश्क', 'हाफ तिकीट', 'आयना का बायना' यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन समित कक्कड यांनी केलंय. त्यामुळे 'रानटी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार? याची उत्सुकता लागली आहे. येत्या २२ नोव्हेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

'रानटी' चित्रपटात शरद केळकरसह संतोष जुवेकर, संजय नार्वेकर, नागेश भोसले, छाया कदम, जयवंत वाडकर, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, शान्वी श्रीवास्तव यांसारख्या कलाकारांती फौज आहे. 

टॅग्स :शरद केळकरसंजय नार्वेकरसंतोष जुवेकरमराठी अभिनेतासिनेमा