Join us

"तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला महाराज दिसले", शरद केळकरने सांगितला छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 11:48 IST

सध्या मराठी मनोरंजनविश्वात समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' (Ranti) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

Sharad Kelkar: सध्या मराठी मनोरंजनविश्वात समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' (Ranti) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यामुळे मराठी सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'रानटी' चित्रपटाच्या माध्यमातून अ‍ॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्सची गुंफण पाहायला मिळणार आहे. 'रानटी' चित्रपटात शरद केळकरसह (Sharad Kelkar) संतोष जुवेकर, संजय नार्वेकर, नागेश भोसले, छाया कदम, जयवंत वाडकर, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, शान्वी श्रीवास्तव यांसारख्या कलाकारांची फौज आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान 'रानटी'ची स्टारकास्ट व्यस्त आहे. येत्या २२ नोव्हेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. 

नुकतीच 'रानटी' चित्रपटाच्या टीमने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेता शरद केळकरला की तुम्ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली तेव्हा सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे होतं. तुम्ही साकारलेल्या भूमिकेचं कौतुकही झालं. पण, तो अनुभव कसा होता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, "खरंच सांगू मला जेव्हा मला पहिल्यांदा ओमने चित्रपट ऑफर केला तेव्हा माझा यावर विश्वास बसला नव्हता. तेव्हा मी म्हटलं कसं करणार? तेव्हा तो मला म्हणाला मला माझे राजे असेच पाहिजे. तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. खरंतर मी नाटकांमध्येही कधी महाराज साकारले नव्हते. त्यानंतर आम्ही लूक टेस्ट करण्याचं ठरवलं."

पुढे अभिनेता म्हणाला, "त्यावेळी विक्रम गायकवाड सरांनी माझा मेकअप केला होता आणि नचिकेत बर्वेने कॉस्च्यूम डिझाईन केला. जेव्हा मी मेकअप रूमधून बाहेर पडलो, तेव्हा अख्खं युनिट तिकडे फिरत होतं. ते सगळे फिरताना थांबले आणि त्यांनी वळून माझ्याकडे पाहिलं. तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला महाराज दिसले. तो क्षण माझ्यासाठी खूप अविश्वसनीय होता. मी विचार केला की हे लोक माझ्याकडे असं का बघत आहेत?  मी तर शरद केळकरच आहे, तो क्षण माझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. मग मी माझ्या आजुबाजूला पाहिलं कोणी माझ्या जवळ उभं आहे का? किंवा कोणी माझ्या मागे उभं आहे का? कारण त्या सगळ्यांनी मला ज्या दृष्टीने मला पाहिलं त्यांना सहज महाराज दिसले. त्यानंतर मी जेव्हा सेटवर जायचो तर तिकडे सगळे शांत व्हायचे. खरंतर अशी संधी खूप कमी लोकांना मिळते." असा खुलासा अभिनेत्याने केला. 

टॅग्स :शरद केळकरमराठी अभिनेतासिनेमासेलिब्रिटी