Swapnil Joshi : मराठी चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी (Swapnil Joshi). स्वप्नील जोशीने उत्तम अभिनय आणि पर्सनॅलिटीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:चं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. स्वप्नीलचा सोशल मीडियावरही भलामोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात. दरम्यान, यंदाचं २०२४ हे वर्ष स्वप्नीलसाठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं, मग ते स्वप्नीलची निर्मिती विश्वात पदार्पण असो किंवा सुपरहिट चित्रपट! अशातच अभिनेत्याने सोशल मीडियावर नुकतीच एक गुडन्यूज शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नुकतीच अभिनेत्याने नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्याने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली.
वर्ष संपताना स्वप्नीलची स्वप्नपूर्ती झाली असून त्याने त्याच्या घरी नवीन गाडीचं स्वागत केलं आहे! स्वप्नील ने नवीकोरी रेंज रोव्हर डिफेंडर घेतली असून पुन्हा हे वर्ष खास केलं आहे. शिवाय मार्केट व्हॅल्यूनुसार गाडीची किंमत कोटींच्या घरात आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वप्नील जोशीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान, अभिनेता ज्या ठिकाणी नवी गाडी खरेदी करण्यासाठी गेला त्या शोरुममध्येही त्याचं उत्तम पद्धतीने स्वागत केलं गेलं. त्याचबरोबर स्वप्नीलच्या चित्रपटांमधील गाजलेल्या व्यक्तिरेखांचे पोस्टर्सही त्याच्या आजूबाजूला लावल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहेत. असं असताना अभिनेत्याने सोशल मीडिया वर खास पोस्ट करून नव्या गाडी बद्दल व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये खास गोष्ट लिहिली आहे. 'डिअर जिंदगी!' असं म्हणत सोशल मीडियावर एक छान पत्र लिहून त्याने त्याचा भावना व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये स्वप्नीलने लिहलंय, " डिअर जिंदगी- आजचा दिवस नक्कीच खास आहे आणि तितकाच अभिमानास्पद देखील आहे. बाबांना आमच्या नवीन रेंज रोव्हर डिफेंडरची चावी घेताना बघणं हा एक अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण आहे. डिफेंडर ही एक फक्त एक गाडी नाहीये ही आम्ही गाठलेल्या प्रत्येक अडचणींचे, आम्ही बांधलेल्या प्रत्येक गोष्टीचे प्रतीक आहे असं मला वाटतं. ही फक्त सुरूवात आहे माहित आहे की या प्रवासात चढ-उतार आले आहेत पण, जिद्दीने पार करून अजून गोष्टी करण्याची ऊर्मी यातून मिळतेय." असं त्याने म्हटलं आहे.
ब्लॉकबस्टर चित्रपट, सातत्यपूर्ण काम आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा निर्माता - अभिनेता स्वप्नील येणाऱ्या वर्षात देखील वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जिलबी', 'सुशीला- सुजीत' सोबत अनेक चित्रपटात स्वप्नील दिसणार असून प्रेक्षक त्यांच्या प्रोजेक्ट्स साठी उत्सुक आहेत.