Join us  

'हातात वृत्तपत्र अन्...' वैभव मांगलेची मुलांवर मराठी वाचनाची सक्ती; व्हिडीओचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 2:11 PM

प्रसिद्ध अभिनेता वैभव मांगलेने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. 

Vibhav Mangle : अनेक नाटक, मराठी मालिका तसेच चित्रपटांमधून काम करत अभिनेता वैभव मांगले नावारुपाला आला. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने मराठी कलविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं. 'टाईमपास' चित्रपटात अभिनेत्याने साकारलेली भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. अभिनयाबरोबरच वैभव त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखला जातो. सध्या सोशल मीडियावर वैभव मांगलेची मुलं मराठी वृत्तपत्र वाचन करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अभिनयाव्यतिरिक्त वैभव मांगले सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकताच त्याने फेसबुकवर त्याच्या मुलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये वैभवने त्याच्या दोन्ही मुलांना मराठी वृत्तपत्र वाचण्यासाठी दिलं आहे. त्यांच्यामध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी याकरिता त्याने ही सवय आपल्या मुलांमध्ये जोपासण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडीओमध्ये त्याची दोन्ही मुलं हातात वृत्तपत्र घेऊन मराठी वाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत अभिनेत्याने त्यावर  "मराठी वृत्तपत्र वाचन, सक्तीचे केले..." असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या कृतीचं तोंडभरून कौतुक केलंय. शिवाय त्याच्या व्हायरल फेसबुक पोस्टवर यूजर्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. 

वर्कफ्रंट- 

वैभव मांगलेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास त्याने २००४ साली 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.  'टाइमपास' मधील त्याची भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनावर कोरलेली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त वैभवने 'एक गाव भुताचा', 'मालवणी डेज', 'माझे पती सौभाग्यवती' आणि 'शेजारी शेजारी पक्के शेजारी' यांसारख्या मालिकेतही काम केले आहे. 

टॅग्स :वैभव मांगलेमराठी अभिनेतासेलिब्रिटी