Ashwini Bhave : ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. दमदार अभिनय तसेच निखळ सौंदर्याच्या जोरावर अश्विनी यांनी हिंदी सिनेसृष्टी गाजवली. मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात त्यांनी आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण केला. 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटामुळे त्या लोकप्रिय झाल्या. सध्या मराठी कलाक्षेत्रात अश्विनी भावे यांच्या आगामी 'घरत गणपती' या चित्रपटाची चर्चा आहे. जवळपास २५ वर्षानंतर अश्विनी भावे अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत काम करताना दिसणार आहेत. येत्या २६ जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अलिकडेच अश्विनी यांनी 'इट्स मज्जा' ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल काही खास आठवणी सांगितल्या. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "लक्षा हा एक असा कलाकार आहे जो नुसता उत्तम कलाकार होता आहे असं नाही, तर तो एक सहृदयी माणूस होता. त्याने कधी कोणाचं उणधुणं काढलं नाही. मी तरी असं काही ऐकलं नाही शिवाय त्याने कधीच सेटवरचं वातावरण तंग होऊ दिलं नाही". या मुलाखतीत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दलच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, "आमच्या क्षेत्रामध्ये खूप असे प्रसंग येतात की टेन्शनच असतं. सतत एका प्रेशरखाली संपूर्ण सेट काम करत असतो. अशावेळी लक्ष्मीकांत बेर्डेसारखा माणूस सेटवर असेल तर त्या सेटवर खूपच सकारात्मक वातावरण असायचं. तो एक उत्तम कलाकार तसेच उत्तम अभिनेता होता, पण तो खूपच लवकर गेला".
वर्कफ्रंट-
‘अंतरिक्ष’ नावाच्या विज्ञान विषयक मालिकेमधून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. ‘शाबास सुनबाई’ या चित्रपटामधून त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. पण ‘अशीही बनवाबनवी’ या चित्रपटाने त्यांना वेगळी ओळख दिली. अगदी या चित्रपटानंतर त्यांना हिंदीतून ऑफर येऊ लागल्या. ‘हिना’ हा गाजलेला सिनेमा आणि या चित्रपटातील ‘देर ना हो जाए कही देर ना हो जाए’ हे गाणं आठवलं की आजही अश्विनी भावे यांचा चेहरा डोळ्यांपुढे येतो.