Kranti Redkar : क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘जत्रा’, ‘फक्त लढं म्हणा’ यांसारख्या चित्रपटांमुळे ती घराघरात पोहोचली. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. नुकतीच अभिनेत्री क्रांती रेडकर तसेचसमीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी त्यांच्या लग्नाच्या आठवणी शेअर केल्या.
दरम्यान, नुकतीच क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी 'सन मराठी' वाहिनीवरील टॉक शो ‘होऊ दे चर्चा या कार्यक्रमात हजेरी लावली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलाय. सन मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या शोचे अँकरपद प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सांभाळत आहे. त्यादरम्यान, या दोघांनाही त्यांच्या लग्नातील खास आठवणी सांगितल्या. व्हिडीओमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी क्रांती आणि समीर वानखेडे यांना त्यांच्या तुमचं लग्न कसं झालं? आणि तेव्हा समीर वानखेडे वेळेवर पोहोचले होते का? असा प्रश्न विचारते. त्यावर आमचं तीन पद्धतीने लग्न झालं होतं असं त्यांनी सांगितलं.
पुढे अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणते, "तेव्हा काय झालं, पहिल्यांदा आम्ही मंदिरात लग्न (Temple Wedding) केलं. त्याच्यानंतर मग आमच्याकडे म्हणजेच एमसीएला लग्न झालं. मग समीर यांच्याकडे सेंट रेजिसमध्ये आमचं रिसेप्शन झालं. शिवाय आम्ही कोर्ट मॅरेज देखील केलं. असे आमचे चार इव्हेंट झाले. पण, ज्या दिवशी मंदिरात लग्न होतं तेव्हा मला खूपच उशीर झाला होता. म्हणजे लग्नाचा मुहूर्त टळून जात होता. त्यावेळी मी ट्रॅफिकमध्ये अडकले होते. पूर्ण लग्न होईपर्यंत ते माझ्यासोबत नाराज झाले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की लग्नाच्या दिवशी तरी वेळेत यायला पाहिजे". असा किस्सा अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितला.
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. एनसीबीचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे आणि क्रांती यांना जुळ्या मुली आहेत. झिया आणि जायदा असे त्यांच्या मुलींची नावे आहेत. क्रांती आणि समीर यांचा अगदी सुखाचा संसार सुरू आहे. या दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
क्रांती आणि समीर यांची एकमेकांशी १९९७ पासून ओळख होती मात्र, कॉलेजच्या दिवसात ते दोघेही एकमेकांचा प्रचंड राग करायचे. यानंतर या भांडणाचे रुपांतर तब्बल १० वर्षांनी मैत्रीमध्ये झाले. पुढे जवळपास ५ ते ६ वर्ष एकमेकांच्या संपर्कात राहिल्यावर दोघांनीही २०१७ मध्ये लग्न केलं.