Sanskruti Balgude:संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'पिंजरा' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या या अभिनेत्रीने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं. अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या संस्कृती बालगुडेने तिच्या करिअरमध्ये अनेकदा रिजेक्शनचा सामना केला आहे. यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.
नुकतीच संस्कृती बालगुडेने 'इट्स मज्जा' ला मुलाखत दिली. या मुलखतीदरम्यान तिने करिअरमधील चांगल्या वाईट अनुभवांबद्दल सांगितलं. याबद्दल मुलाखतीमध्ये बोलताना संस्कृती म्हणाली, "माझ्या मॅनेजमेंट टीमसोबत मी एका ठिकाणी गेले होते. तेव्हा त्या चित्रपटाचे जे दिग्दर्शक होते त्यांच्याकडे माझा नंबर नव्हता, मग त्यांनी माझ्या आईच्या माध्यमातून मला संपर्क केला. तर त्यावेळी त्यांच्या डोक्यात एक गोष्ट फिट होती की, या रोलसाठी आम्हाला ही हवी आहे, आणि मला त्या सिनेमाचं कथानक प्रचंड आवडलं होतं. त्याच्यामध्ये तीन महत्वाची पात्रे होती आणि माझं ग्रे कॅरेक्टर होतं. लव्हस्टोरी वगैरे काहीच नव्हतं. या प्रोजेक्टसाठी मी प्रचंड उत्सुक होते कारण मला कधीच कोणी ग्रे कॅरेक्टरसाठी विचारलं नव्हतं. शिवाय या चित्रपटात त्या पात्राला खूप महत्व होतं."
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "सगळी प्रोसेस झाली. मी त्या मॅनेजरला सांगितलं की, मला हा सिनेमा करायचा आहे. यावर त्यांनीही होकार दिला. मग मानधनाच्या बाबतीत बोलणं सुरु झालं. त्यानंतर मला एक ठरावीक रक्कम ऑफर करण्यात आली. कमी मानधन देऊनही मी तो सिनेमा करायचा ठरवलं. तेव्हा माझे जे कास्टिंग दिग्दर्शक होते त्यांचा मला एक फोन आला होता. 'तुझं टीममध्ये स्वागत आहे', असं ते म्हणाले. त्यानंतर दोन दिवसानंतर मला समजलं की कास्टिंगमध्ये अचानक बदल करण्यात आला आहे. दुसरं कोणालातरी कास्ट करण्यात आलं. त्यामुळे माझं असं झालं होतं की अरे, मला हा सिनेमा करायचा होता आणि कास्टिंग बदलण्यात आलं."