Join us  

"या उत्सवाचं स्तोम झालंय, त्यामुळे प्रत्येकाने विचार करावा..." सुकन्या मोने स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 3:45 PM

गणेशोत्सवाचंं बदलतं स्वरूप पाहून अभिनेत्री सुकन्या मोने यांनी त्यावर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. 

Suknya Mone On Ganghotsav : देशभरात गणेशाचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साह, जल्लोषाने वातावरण भारावून गेले आहे. प्रत्येक जण आपापल्यापरीने गणेशाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. खासकरून सोशल मीडियावरही प्रत्येक जण गणरायांप्रती असलेला भावभक्तीचा जागर करताना दिसून येत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’चा गगनभेदी जयघोष, वरुणराजाने अधूनमधून दिलेली सलामी, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी सर्वत्र पाहायला मिळते आहे.  अशातच गणेशोत्सवाचंं बदलतं स्वरूप पाहून अभिनेत्री सुकन्या मोने यांनी त्यावर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.

नुकतीच सुकन्या मोने यांनी त्यांच्या पती संजय मोने यांच्यासह 'लोकमत फिल्मी'च्या 'गजर बाप्पा' या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. या दरम्यान सुकन्या यांनी म्हटलं, "श्रद्धा ही प्रत्येकाची असते. फक्त या उत्सवाचं स्तोम खूप झालं आहे, आता असं मला वाटतं. पण त्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. दहीहंडी किंवा इतर कार्यक्रमांना आपण मोठ-मोठ्याने स्पीकर लावतो. पण आपल्या आजुबाजूच्या परिस्थितीचा आपण विचार करत नाही. आपण एक नागरिक आहोत आणि मुळात म्हणजे आपण माणूस आहोत. शिवाय आपल्यासारखंच अजून कोणीतरी म्हणजेच जेष्ठ नागरिक असो अथवा काही मुलांची परिक्षा चालू असते. त्याचबरोबर आपल्या आजुबाजूला काही हॉस्पिटल्स असतात तिथे लहान-लहान मुलं असतात, त्यांच्यावर या गोष्टींचा किती परिणाम होतो याचा देखील आपण केला विचार केला पाहिजे".

पुढे सुकन्या मोने म्हणाल्या, "खरंतर,आता आपल्यकडे इतकं छान नियोजन केलेलं असतं. आता छोट्या-छोट्या मैदानांमध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं. याचा उद्देश येवढाच असतो की तुम्ही मोठ्या ठिकाणी जाऊ नका. याचा आपण उपयोग केला पाहिजे. याच्यामध्ये दर्शनाला जाताना चेंगराचेंगरी होते आणि अनेकांचे यात जीव जातात. दर्शन तर होत नाहीच पण कोणी सेलिब्रिटी किंवा खेळाडू त्या ठिकाणी गेला तर दर्शनापेक्षा त्यांच्याबरोबर फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी लोक वेळ घालवतात. यापेक्षा त्या ठिकाणी जाऊन मनोभावे बाप्पाची पूजा करा". असं मत त्यांनी व्यक्त केलं. 

सुकन्या मोने यांनी 'आभाळमाया', 'जुळून येती रेशीमगाठी', 'वादळवाट', 'कळत नकळत', 'प्रेमासाठी वाट्टेल ते', 'एकापेक्षा एक' अशा कितीतरी मालिका, सिनेमांमध्ये काम करुन सुकन्या यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. अलिकडेच त्यांचा बाईपण भारी देवा हा सुपरहिट सिनेमा सुद्धा रिलीज झाला. त्यामुळे त्या चर्चेत येत आहेत.

टॅग्स :सुकन्या कुलकर्णीगणेशोत्सव 2024दहीहंडीसोशल मीडियासेलिब्रिटी