Join us  

"तो एवढा गोड माणूस आहे ना.." उषा नाडकर्णींनी साऊथ स्टार विजय सेतुपतीचं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 1:23 PM

अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवली.

Usha Nadkarni : अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवली. चार दशकांहून अधिक काळ त्या इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अनेक मराठी मालिका, सिनेमे तसेच नाटकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच मनोरंजन केलं. एक बिनधास्त, मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे.  मराठी, हिंदी कलाविश्वात काम केल्यानंतर उषा नाडकर्णी यांनी दक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. साऊथ सिनेस्टार विजय सेतुपतीसोबत त्या स्क्रीन शेअर करणार आहेत.  

नुकतीच त्यांनी 'इट्स मज्जा' ला दिलेल्या मुलाखतीत मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचे कान टोचले आहेत. या मुलाखतीत सुपरस्टार विजय सेतुपतीचं उदाहरण देत त्यांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे.

उषा नाडकर्णी 'गांधी टॉक्स' या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येत आहेत. या सिनेमात त्यांनी अभिनेता विजय सेतुपतीच्या आईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी एकत्र काम केलं. त्यादरम्यान अभिनेत्याचा साधा, मनमिळावू स्वभाव उषा नाडकर्णी यांना प्रचंड भावला. त्याविषयी बोलताना त्यांनी विजय सेतुपतीबद्दल मुलाखतीत कौतुकोद्गार काढले. 

काय म्हणाल्या उषा नाडकर्णी-

या मुलाखतीत उषा नाडकर्णी म्हणाल्या, "गांधी टॉक्स या सिनेमात मी त्याच्या आईची भूमिका साकारली आहे. साऊथचा सुपरस्टार असूनही विजय सेतुपती खूप गोड माणूस आहे. आपल्याकडे मराठी किंवा हिंदी इंडस्ट्रीत थोडी प्रसिद्धी जरी मिळाली तरी माज दाखवला जातो. पण इतका एवढा मोठा माणूस आहे तरी खाली जमिनीवर मांडी घालून बसतो. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी मी त्याच्यासोबत खूप गप्पा मारल्या. तो इतका साधा आहे, हे लोकांनी शिकलं पाहिजे. ज्या दिवशी सिनेमाच्या शूटिंगचं पॅकअप झालं तेव्हा त्याने मला नमस्कार केला. मी त्याला असा उचलला, त्याचे गाल ओढले होते कारण मला तो आवडला. कारण एवढा मोठा नट आहे तरी माज नाही ओ. कारण आपल्याकडे एवढसं असलं तरी माज किती असतो". अशा प्रखर शब्दांत त्यांनी आपलं टिकास्त्र सोडलं. 

टॅग्स :उषा नाडकर्णीमराठी चित्रपटसेलिब्रिटी