गेल्या काही वर्षांमध्ये जंगलाचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण सुरु झालं आहे. परिणामी, जंगल असलेल्या ठिकाणी बांधकाम करुन मोठ्या कंपन्या, इमारती बांधण्यात आल्या आहेत. याचाच परिणाम वन्यजीवांवरही होत आहे. त्यामुळेच विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची (Territory) थरारक कथा लवकरच उलगडली जाणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर लॉन्च झाला आहे.
'टेरिटरी' या सिनेमामध्ये संदीप कुलकर्णी, किशोर कदम यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार असून या सिनेमाचं दिग्दर्शन सचिन श्रीराम करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जंगलात नरभक्षक झालेला वाघ जंगलातून गायब होतो, या नरभक्षक वाघाला मारण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी दिली जाते आणि सुरू होतो एक थरारक शोध, या कथासूत्रावर 'टेरिटरी' हा चित्रपट बेतला आहे. चित्रपटाचा टीझर कथानकाप्रमाणेच दमदार आहे. विशेषतः छायांकन आणि पार्श्वसंगीतामुळे हा टीझर विलक्षण परिणामकारक झाला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीचे कुतूहल आता अधिकच वाढले आहे. सचिन श्रीराम दिग्दर्शित "टेरिटरी" प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून खिळवून ठेवणार हे टीझरवरून दिसून येत आहे.
दरम्यान, हा सिनेमा १ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती श्रीराम मुल्लेमवार यांच्या डिव्हाईन टच प्रॉडक्शन्सअंतर्गत करण्यात येत आहे. हा सिनेमा कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ग्रीन अॅकॅडमी अॅवॉर्ड्स, गोल्ड फर्न फिल्म अॅवॉर्ड्स अशा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवला गेला आणि पारितोषिकप्राप्त ठरला आहे.