Join us

प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने रंगभूमीवरील सदाबहार चेहरा हरपला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 4:42 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

Devendra Fadnavis on Pradeep Patwardhan: आपल्या अभिनयाने नाट्य आणि सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज निधन झालं. आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळली. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर सर्वच स्तरातून भावना व्यक्त करण्यात आल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोकसंवेदन व्यक्त केल्या. ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांची अकाली ‘एक्झिट’ मनाला चटका लावणारी आहे. रंगभूमीवरचा हसरा आणि सदाबहार चेहरा आता यापुढे दिसणार नाही, याचे अतिशय वाईट वाटते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

'जेव्हा फक्त दूरदर्शनचा जमाना होता, त्या मनोरंजनाच्या प्रारंभीच्या काळात अनेक मालिकांच्या माध्यमांतून घराघरात ते पोहोचले आणि नंतर अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपली स्वत:ची अमिट अशी छाप उमटवली', असे फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. 'मोरुची मावशी’ या नाटकाचे स्मरण होताना प्रत्येक वेळी प्रदीप पटवर्धन यांची आठवण होईल. अनेक चित्रपट सुद्धा त्यांनी गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट आणि चाहते यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमराठीमृत्यू