सोशल मीडियावर फेक अकाऊंट्सचा सुळसुळाट झाला आहे. अनेक फेक अकाऊंटवरुन मेसेज करत युजर्सची फसवणूक केल्याच्या घटना रोज घडत आहेत. अनेक सेलिब्रिटींची अकाऊंट हॅक करूनही त्याद्वारे चाहत्यांना मेसेज करून फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरू करण्यात आलं आहे. दिग्दर्शकाने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
दिग्पाल लांजेकर यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट सुरू करण्यात आलं आहे. या अकाऊंटद्वारे चाहत्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जात आहे. तसंच मेसेजही केले जात आहेत. दिग्पाल लांजेकरांचं नाव आणि फोटो वापरुन हे प्रोफाइल तयार करण्यात आलं आहे. याबाबत पोस्ट करत दिग्पाल लांजेकरांनी चाहत्यांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. "सावधान राहा..आत्ता माझा प्रोफाइल फोटो वापरून fake accounts create केली जात आहेत आणि त्या accounts वरून अनेक लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट जात आहेत.. मेसेज करत आहेत त्याला रिप्लाय करू नका. कृपया या प्रोफाईल रिपोर्ट कराव्यात..सावधानता बाळगा आणि कुठलीही माहिती देऊ", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दिग्पाल लांजेकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर ऐतिहासिक सिनेमे बनवण्यासाठी ते ओळखले जातात. 'फर्जंद', 'पावनखिंड', 'फत्तेशिकस्त', 'सुभेदार', 'शेर शिवराज', 'शिवरायांचा छावा' या सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.