मराठी कलाविश्वात सध्या 'शिवरायांचा छावा' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. आता 'शिवरायांचा छावा' चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या सिनेमात अभिनेता भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. संभाजी महाराजांची भूमिकेसाठी दिग्गज कलाकार सोडून भूषण पाटीलची निवड करण्यामागे एक खास कारण आहे. याचा दिग्पाल लांजेकर यांनी नुकताच खुलासा केला आहे.
'शिवरायांचा छावा' सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नुकतेच अल्ट्रा मराठी बझला मुलाखत दिली. यावेळी भूषण पाटील याला संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेत निवडायचं कारण काय असा प्रश्न दिग्पाल लांजेकर यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, 'छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी मला कोणतेही बॅगेज नको होतं. अमुक एका चित्रपटात तो असा दिसलाय. अमुक एका चित्रपटात तो असा दिसला, असं नको होतं. त्यामुळे मला ते सोपं गेलं'.
पुढे ते म्हणाले, 'निवड करताना अनेक कसोट्यामधून तो गेला आहे. त्याची निवड अगदी सहज झालेली नाही. त्याच्याबरोबर अनेक कलाकारांच्या लुक टेस्ट, ऑडिशन झाल्या आहेत. भुषणला इतिहासाबद्दल किती माहिती आहे, कशा पद्धतीने त्यानं वाचन केलेलं आहे, या सर्व गोष्टी पाहिल्यानंतरच त्याची निवड झाली'. तर संभाजी महाराजांचा अतुलनीय इतिहास या सिनेमातून उलगडून दाखवण्यात येणार आहे.
'शिवरायांचा छावा' हा सिनेमा १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या 'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj), 'सुभेदार' (Subhedar) या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता त्यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सिनेमातून पुन्हा एकदा ऐतिहासीक सिनेमाची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.