मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे ( Kedar Shinde) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात. सध्या त्यांची अशीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. आज ‘एप्रिल फूल’च्या निमित्ताने खासगी आयुष्यातील एक भन्नाट किस्सा केदार शिंदे यांनी शेअर केला आहे.
1 एप्रिल हा दिवस ‘एप्रिल फूल’ म्हणून साजरा केला जातो. एकमेकांना ‘फूल’ म्हणजे मूर्ख बनवायचं आणि आपण केलंलं ‘फूल’ यशस्वी झालं की, समोरच्याची फजिती पाहत खो-खो हसत सुटायचं. या ‘एप्रिल फूल’चे अनेक रंजक किस्से, प्रसंग तुम्हाला माहित असतील. असाच एक किस्सा केदार शिंदे यांनी शेअर केला आहे. अर्थात यात एक ट्विस्ट आहे.
तर गोष्ट आहे 32 वर्षांपूर्वी 1 एप्रिलची. हो, 32 वर्षांपूर्वी 1 एप्रिल याचदिवशी केदार शिंदे यांना तिने होकार दिला, हा किस्सा त्यांनी अतिशय रंजक पद्धतीने शेअर केला आहे.
वाचा, केदार शिंदेंची पोस्ट, त्यांच्याच शब्दांत...1 एप्रिल 1991... दोन वर्षांची उमेदवारी केल्यावर तीने (बेला शिंदे) मला होकार दिला. अंकुश चौधरी तेव्हा होता माझ्या सोबत. तीला भेटून ट्रेनचा प्रवास करत आम्ही दादर पुर्वेकडील एका इराणी हॉटेलात चहा- बनमस्का खाताना, अचानक आठवलं ‘आयला अंकी, मला बेलाने एप्रिल फूल तर केलं नसेल ना?’ त्यावेळी मोबाईल नव्हते. त्यात तीच्या घरच्या लँडलाईनवर फोन करण्याची हिंमत अजिबात नव्हती. ती पुन्हा जोवर भेटली नाही तोवर माझ्यासाठी तिने एप्रिल फूल केलं यावर विश्वास ठेवण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण पण पण.... ती त्या 1 एप्रिल रोजी माझ्या आयुष्यात आली ती, बेला के फूल बनून. आज 1 एप्रिल 2022.. घरातून निघण्याच्या आधी पुन्हा आम्ही त्या आठवणीत रमलो. अंकुश तुला मीस केलं रे,’ अशी पोस्ट केदार यांनी लिहिली आहे.