२०२३ हे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. या वर्षांत अनेक मोठ्या सिनेमांना मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर काटें की टक्कर दिली. मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंनी 'महाराष्ट्र शाहीर' आणि 'बाईपण भारी देवा' सारखे सिनेम या वर्षात सिनेसृष्टीला दिले. त्यांच्या या दोन्ही सिनेमांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. पण, या सिनेमांबरोबरच इतरही अनेक गोष्टी केदार शिंदेंना या वर्षाने दिल्या. २०२३च्या वर्षा अखेरीस केदार शिंदेंनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदेंची '२०२३'साठी खास पोस्ट
प्रिय २०२३, तू खूप काही देऊन चालला आहेस. आत्मविश्वास, जाणीव, जबाबदारी...असं बरंच काही!
बाबांच्या (शाहीर साबळे) जन्मशताब्दी वर्षात 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमा करण्याचं बळ तू दिलंस...घराघरात असणाऱ्या स्त्रियांना सलाम करण्याची संधी 'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या निमित्ताने तू दिलीस...
खूप लोक आयुष्यात आणलीस, नको ती लोकं तूच बाजूला सारलीस...जाता जाता 'कलर्स मराठी' या वाहिनीच्या 'हेड ऑफ प्रोग्रामिंग' याचं आव्हान देऊन गेलास...
२०२३ तुझा मी ऋणी आहे. फक्त एकच विनंती...निघाला आहेस तर तुझ्या २०२४ या मित्राला अशीच मला साथ द्यायला सांग! खूप चांगलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या कलाकृती सादर करण्याचं मानस आहे. तो तडीस नेण्यासाठी त्याची सोबत लागेल.
केदार शिंदेंच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.