Join us  

"बहुजन समाजातून आल्याने त्यांना ओळख मिळाली नाही, पण...", शाहीर साबळेंबाबत केदार शिंदेंनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 9:58 AM

केदार शिंदे यांनी शाहीर साबळे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत पोस्टमधून त्यांना अभिवादन केलं आहे. त्याबरोबरच खंतही व्यक्त केली आहे. 

'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या शाहीर साबळे यांचा आज जन्मदिवस आहे. शाहीर साबळे यांनी त्यांच्या पोवाड्यातून मनोरंजन करत समाज प्रबोधन केलं. त्यांच्या जयंतीनिमित्त दिग्दर्शक केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. केदार शिंदे यांनी शाहीर साबळे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत पोस्टमधून त्यांना अभिवादन केलं आहे. त्याबरोबरच खंतही व्यक्त केली आहे. 

केदार शिंदेंची पोस्ट 

माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग. शाहीर साबळे म्हणजे माझे बाबा. दरवर्षी या दिवशी नाही तर, सतत त्यांना मी miss करतो. कारण आज जो काही मी आहे तो, एक स्वामींमुळे आणि माझ्या बाबांमुळे. माझ्या आयुष्यात त्यांचे कलात्मक संस्कार झाले नसते तर मी काय केलं असतं? 

 

३ सप्टेंबर म्हणजे आमच्या बाबांच्या घरी सण साजरा व्हायचा. घराबाहेर चपलांचा सडा पडलेला असायचा. कोण कुठले येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे. चहापाणी यांची रेलचेल असायची. महाराष्ट्रातील रसिकांसाठी त्यांनी खूप काही केलं त्याही पेक्षा महाराष्ट्रातील जनतेसाठी एक शाहीर म्हणून कर्तव्य बजावलं आहे. 

बहुजन समाजातून आल्याने त्यांना so called recognisation नाहीच मिळालं, पण त्यांनी लोकांची मन जिंकली आणि आवाजाने कान तृप्त केले. मी त्यांच्यासाठी येणाऱ्या पिढ्यांना स्मरण असावं म्हणून "महाराष्ट्र शाहीर" हा सिनेमा केला. आता कित्येक पिढ्या Google search मारतील, shaheer? आणि यांचा जिवन पट समोर येतच राहील. श्री स्वामी समर्थ.

केदार शिंदे आणि शाहीर साबळे यांचं नातं काय? 

केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहे. शाहीर साबळे यांची कन्या चारुशीला साबळे या केदार शिंदेंच्या आई आहेत. केदार शिंदेंनी शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित केला होता. या सिनेमातून त्यांनी शाहीर साबळे यांचा जीवनपट उलगडला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :केदार शिंदेसिनेमामराठी अभिनेता