कोरोनाने देशात थैमान घातले आहे. रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत. आॅक्सिजन, आयसीयू बेड्सअभावी रूग्णांना जीव गमवावा लागतोय. कोरोनाची भीषण स्थिती बघता अनेक राज्यांत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत आणि अशाही स्थितीत आयपीएल सारखा इव्हेंट अगदी जल्लोषात सुरु आहे. म्हणायला प्रेक्षक नाहीत, पण म्हणून आयपीएलचा थाट कमी नाही. दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी यानिमित्ताने एक जळजळीत पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय.
‘याक्षणी बक्कळ पैसा कमावणारे म्हणजे... रणवीर सिंग आणि त्याच्या जाहिरातींच्यामधे दाखवले जाणारे आयपीएलवाले. दिल्लीच्या व अहमदाबादच्या सरणावर आयपीएल जोरावर...’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली आहे.त्यांच्या या पोस्टवर नेटक-यांनीही तितक्याच जळजळीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘केदार दादा, खूप दिवसांनी बोललात, पण कमाल चपराक दिली,’ अशी कमेंट त्यांच्या या पोस्टवर एका युजरने केली. योग्यक्षणी, योग्यवेळी, योग्य निशाणा. एकही मारा लेकीन सॉलिड मारा, असे एका युजरने यावर लिहिले़.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केदार शिंदे यांच्या अनेक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राजकीय नेत्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? असा सवाल अलीकडे त्यांनी विचारला होता. टीव्हीसाठी बाईट्स देणा-या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते़ त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? हवाय कशाला एवढा फौजफाटा? मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असतील, अशी पोस्ट त्यांनी अलीकडे लिहिली होती.