बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुशांत नेपोटिझमचा बळी धरला, असा एक सूर सोशल मीडियावर उमटत आहे. कंगना राणौतच नाही तर रवीना टंडन, अभिनव कश्यपसारख्या बॉलिवूडमधील काही स्टार्सही आता यावर उघडपणे बोलत आहेत. आता या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील घराणेशाहीचा मुद्दाही समोर आला आहे. मराठीतील दिग्गज निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील मक्तेदारी व घराणेशाहीवर प्रहार केला आहे. बॉलिवूडमध्येच नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतही घराणेशाही आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
‘मराठी इंडस्ट्रीतही काही स्वयंभू कलाकरांचा गट सक्रीय आहे. हा गट कुण्या नवीन व्यक्तिला मोठ होऊ देत नाहीत. इंडस्ट्रीत कोणी नवीन आला असेल, काही चांगलं काम करत असेल, कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचण्याचे काम आणि आपल्या लोकांना पुढे ढकलण्याचे काम इथेही अनेक वर्षांपासून सुरु आहे. ही मंडळी स्वत:ला अतिशहाणे समजतात. हे लोक समोरून वार करत नाहीत, तर पडद्यामागून ही सूत्र हलवली जातात. व्यक्तिश: मी सुद्धा याचा अनुभव घेतला आहे. तुला इंडस्ट्रीतून काढून टाकणार, असे अनेकांनी मला म्हटले होते. पण मी अशा मंडळींना पुरून उरलो. मी माझ्या कर्तृत्वाने मोठा झालोय. अशा मंडळींना मी फाटावर मारतो. माझ्या चित्रपटांबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्यात. माझे कधीच कौतुक केले गेले नाही. मला प्रचंड मन:स्ताप दिला गेला. मात्र मी या मंडळींचे डाव हाणून पाडलेत. नवीन मंडळी इंडस्ट्रीत आलेत तर आपले प्रतिस्पर्धी वाढतील, अशी भीती त्यांना असते आणि त्यातून ते नव्यांचे खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न करतात. मराठी इंडस्ट्रीत घराणेशाही नाही, असे कितीही सांगितले जात असले तरी इथेही ती आहे. इंडस्ट्रीत फक्त २० टक्के लोकं चांगली आहेत. बाकी सगळी ग्रुपमध्ये वावरणारी आहेत. नको त्या चित्रपटांना पुरस्कार दिले जातात, ठराविक लोकांचा उदोउदो केला जातो. यांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. नवीन आलेल्या कलाकारांना पाण्यात बघितले जातात. मैत्री, एकमेकांना मिठ्या मारणे हे केवळ दाखवायचे दात आहेत. अशा लोकांना पुरून उरणे हाच एक उपाय आहे. त्यामुळे यांच्याशी संघर्ष करा, मनस्वास्थ्य ढळू देऊ नका, असे महेश टिळेकर या व्हिडीओत म्हणत आहेत.