मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ते उघडपणे भाष्य करत असतात. यात अनेकदा ते बोचऱ्या शब्दांत टीकाही करतात. विशेष म्हणजे महेश टिळेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासोबतच त्यांच्या समाजकार्यासाठीही ओळखले जातात. त्यामुळे सोशल मीडियावर ते सतत चर्चेत येत असतात. परंतु, यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्येविषयी एक पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
काही दिवसांपूर्वी बीडमधील एका शेतकऱ्याने उसाच्या फडाला आग लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली. अनेक ठिकाणी मोठमोठे हेडिंग्सही झळकले. परंतु, या घटनेवर महेश टिळेकर यांनी एक पोस्ट शेअर करत प्रशासनाला जाब विचारला आहे. महेश टिळेकर यांनी फेसबुकवर एका वृत्तपत्रातील बातमी शेअर केली आहे. सोबतच त्यांचे विचारही मांडले आहेत.
काय म्हणाले महेश टिळेकर?
"आणखी एक आत्महत्या.. शेतीप्रधान देशात बळीराजा सुखी नाही. व्यवस्थेने बळी घेतलेल्या या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे अश्रू पुसायला मीडिया घेऊन नेते मंडळी गरीब शेतकऱ्याच्या झोपडीत जातील, न्यूज चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज सुरू होतील, या घटनेचं भांडवल करून त्यात राजकीय रंग भरून विरोधक सत्ताधारी पक्षावर तुटून पडेल . पण..पण जीवाला मुकलेल्या गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबाला कायमस्वरूपी आधार देणारा कुणी नेता नाही.. आत्महत्या केलेल्या त्या शेतकऱ्याची बायको दुःख पचवून जगण्यासाठी इतरांच्या शेतात रोजंदारीवर खुरपणी करताना दिसेल. समाजातील तुम्ही आम्ही शिकली सवरलेली माणसं हॉटेलमध्ये जेऊन निमूटपणे आलेलं बिल देणारे शेतकऱ्याकडून 20 रुपयांची भाजीची गड्डी घेताना मात्र घासाघीस करताना दिसू. शेतकऱ्याच्या कष्टाचं आणि आटवलेल्या रक्ताचं मोल व्यवस्थेला कळणार कधी?भारत माझा देश आहे आणि या देशातील शेतकरी माझे अन्नदाते आहेत ही भावना सगळ्यांच्या मनात रुजणार कधी????"
दरम्यान, महेश टिळेकर यांनी यापूर्वीही अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. अनेकदा ते त्यांच्या पोस्टमधून समाजाच्या डोळ्यात अंजन घालायचं काम करतात.