'सैराट','फँण्ड्री', 'पिस्तुल्या', 'झुंड' आणि 'घर बंदूक, बिरयानी' यांसारखे दर्जेदार सिनेमा देणारा लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्याकडे पाहिलं जातं. नागराज मंजुळे त्यांच्या सिनेमामधून समाजातील सत्यपरिस्थिती दाखवायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वास्तवादी सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळतं. विशेष म्हणजे दिग्दर्शनात अव्वल असलेले नागराज मंजुळे अभ्यासाच्या बाबतीत फारच कच्चे होते. सध्या सोशल मीडियावर त्यांची दहावीची मार्कशीट व्हायरल होत आहे. या मार्कशीटमध्ये ते दहावीत असताना दोन वेळा नापास झाल्याचं दिसून येत आहे.
सोशल मीडियावर नागराज मंजुळे यांची दहावीची मार्कशीट व्हायरल होत आहे. ही गुणपत्रिका त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. यात मोठ्या अक्षरात त्याच्यावर फेल (FAIL) असं लिहिलं आहे. ही गुणपत्रिका आज व्हायरल होत आहे.
नागराज मंजुळे यांनी शेअर केलेल्या गुणपत्रिकेमध्ये त्यांनी दहावीला 38.28 टक्के गुण होते. म्हणजे 700 पैकी 268 इतके मार्क्स त्यांना मिळाले होते. 2018 मध्ये महाराष्ट्रा बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणार होता त्यावेळी त्यांनी तो निकाल पुन्हा शेअर केला होता. विशेष म्हणजे अनुत्तीर्ण झालेल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ही गुणपत्रिका शेअर केली होती.
"मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर…मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एम. पी. एस. सी. , यु. पी. एस. सी.… परीक्षा कुठलीही असो ती अंतिम कधीच नसते. यशापयशात… असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही…", अशी पोस्ट नागराज मंजुळे यांनी शेअर केली होती.