Dr. Nagraj Manjule : नागराज मंजुळे ( Nagraj Manjule ) यांची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. कवी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अशी त्यांची ओळख आहेत. आता नागराज मंजुळे यांच्या नावासमोर ‘डॉक्टर’ हे बिरूद लागलं आहे. होय, नागराज मंजुळे यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही मानद पदवी बहाल करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांना ही पदवी देऊन गौरविण्यात आलं.
नागराज यांचे मित्र प्रा. हनुमंत लोखंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. सोबत डॉक्टरेट पदवी स्वीकारतानाचे नागराज यांचे काही फोटोही शेअर केले आहेत.
‘त्या अंधारलेल्या दिवसात एम.फिल किंवा सेट/नेट पूर्ण करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न मला आजही आठवतात. तेव्हा तुम्ही असं काही साध्य करावं, हीच माझी इच्छा होती. तुम्ही अपयश पाहिलं. पण संघर्षापुढे कधी हार मानली नाही. तुमचा 10 वी इयत्ता सोडल्यापासून ते डी.लिटपर्यंतचा एक अविश्वसनीय स्वप्नवत प्रवास आहे.अनेक चित्रपटांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांद्वारे सन्मानित झाल्यानंतर तुम्हाला डी वाय पाटील विद्यापीठाद्वारे डॉक्टर ऑफ लेटर्स ही मानद पदवी प्रदान करण्यात येत आहे. याचा साक्षीदार होणं हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असं हनुमंत लोखंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार सिनेमांची निर्मिती केली. पिस्तुल्या, फँड्री, सैराट या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचं सर्व स्तरातून कौतुक झालं. त्यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने तर इतिहास रचला. मराठी चित्रपटाच्या इतिहासात 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला चित्रपट ठरला होता. त्याआधी ‘फँड्री’ सिनेमाची देखील खूप चर्चा झाली होती. फँड्री या चित्रपटासह ‘पिस्तुल्या’ या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. नुकतंच नागराज यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांचा ‘झुंड’ हा हिंदी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकलं.अनेक चित्रपटांचं लेखन, दिग्दर्शन करण्यासोबतच त्यांनी अभिनयही केला. अनेक चित्रपटात त्यांनी त्यांचं अभिनय कौशल्य दाखवलं.