आज महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु आहे. महाराष्ट्रातले तमाम नागरीक आणि कलाकार मतदानाचा हक्क बजावत आहेत. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले आहे. अनेक कलाकार बोटावर शाई लावतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसने मतदान केल्यावर एक सूचक पोस्ट केलीय.
समीर विद्वांसने बोटावर शाई लावतानाचा फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करुन समीर लिहितो, "जाऊन मतदान नक्की करा.. नाहीतर कुठलीही तक्रार करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. मतदार ‘राजा’ फक्त मतदानाच्या दिवशीच असतो. तो हक्क/अधिकार/कर्तव्य नक्की बजावा!" समीर यांनी लिहिलेली मोजकीच अन् महत्वाची पोस्ट चर्चेत आहे.
दिग्दर्शक समीर विद्वांस हा मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक आहे. समीरने दिग्दर्शित केलेले 'YZ', 'आनंदी गोपाळ', 'डबल सीट' हे मराठी सिनेमे चांगलेच गाजले. याशिवाय कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यनची प्रमुख भूूमिका असलेल्या 'सत्यप्रेम की कथा' हा समीर यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी सिनेमाही चांगलाच गाजला. समीर कायमच आसपासच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करत असतात.