Join us

Viju Mane : "कोणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा..."; दिग्दर्शक विजू मानेंच्या 'त्या' पोस्टची रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 4:32 PM

Viju Mane And Dasara Melava : दिग्दर्शक विजू माने यांच्या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. आता, दोन्ही नेत्यांच्या भाषणावर इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. याच दरम्यान आता दिग्दर्शक विजू माने यांच्या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

"कोणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा मला झेपेल ते मी करतो" असं म्हणत विजू माने यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये एक माणूस निवांत झोपलेला दिसत आहे. "स्वत: उठून नेतृत्व करण्याची माझी पात्रता नाही. त्यामुळे कुणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा मला झेपेल ते मी करतो" असं म्हटलं आहे. त्यांची ही दसऱ्या मेळाव्यावरच्या प्रतिक्रियेची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

विजू माने यांनी "माझी झोप मला प्यारी...×$#त गेली दुनियादारी. राजकीय तज्ञ बनणं थांबवा. काही समस्या फार गंभीर असतात त्यामुळे त्या राजकारण्यांवर सोडून दिलेल्या बऱ्या" असं देखील पोस्टमध्ये म्हटलं आहे. मनसेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावरही बोचरी टीका केली आहे. 

"ज्यांना पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर, त्यांच्याकडून हिंदुत्व शिकायचं?"

"एक रणरागिणी, एक दिवसाची नर्स... यांचा मेंदू डोक्यात आहे की गुडघ्यात? हे कळतं नाही" असं म्हणत मनसेने खोचक टीका केली आहे. तसेच "दुसऱ्यांना पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर आणि त्यांच्याकडून शिवसैनिकांनी हिंदुत्व शिकायचं? कुठे अधोगतीला नेताय शिवसेना? बाळासाहेबांचे विचार कुठे होते?" असा सवाल करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यासोबतच "मुंबईची तुंबई होताना हातावर हात धरून बसलात, लोकांना आयुष्यभर खड्ड्यात चालायला लावलं" असं टीकास्त्रही सोडलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठीवेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :विजू मानेएकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरे