Join us

Zollywood Movie Review : कसा आहे विदर्भातील सतरंगी झाडीपट्टीचं वास्तव दाखवणारा ‘झॉलीवूड’?; वाचा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 5:02 PM

Zollywood Marathi Movie Review : ‘झॉलीवूड’ या चित्रपटात झाडीपट्टीतील वास्तव मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक तृषांत इंगळे यांनी केला आहे. या प्रयत्नांत ते किती यशस्वी झालेत?

-संजय घावरे

दर्जा : **1/2  कलाकार : दिवाकर गावंडे, अजित खोब्रागडे, अश्विनी लाडेकर, काजल रंगारी, अनिल उट्टलवार, निशा धोंगडे, आसावरी नायडूपटकथा, संवाद, दिग्दर्शन - तृषांत इंगळेनिर्माते - प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंगशैली : रिअ‍ॅलिस्टीक ड्रामाकालावधी : १ तास ३० मिनिटे............................

महाराष्ट्रात प्रत्येक बारा कोसांवर भाषा आणि संस्कृतीत झालेला बदल पहायला मिळतो. त्यामुळं महाराष्ट्रात मराठी सिने-नाट्यसृष्टीसोबतच बऱ्याच ठिकाणी आजही विविध लोककलांचे प्रकार पहायला मिळतात. कोकणात जसा दशावतार आहे, तसाच विदर्भात झाडीपट्टी नावाचा नाट्यप्रकार तिथल्या रसिकांना खिळवून ठेवतो. या झाडीपट्टीला झॉलीवूड म्हणूनही संबोधले जाते. ‘झॉलीवूड’ या चित्रपटात झाडीपट्टीतील वास्तव मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक तृषांत इंगळे यांनी केला आहे. बऱ्याच उणीवा राहिल्या असल्या तरी आपल्या मातीतील कला सर्वदूर पोहोचवण्याची तृषांत यांची तळमळ चित्रपट पाहताना जाणवते.

उतारवयातही झाडीपट्टीतील कला टिकवण्यासाठी धडपडणारे सच्चे कलावंत नारायणराव आणि तरुण लेखक-दिग्दर्शक दीपक काळे यांची ही कथा आहे. झाडीपट्टीत नाटक कंपनी चालवण्याचे काम प्रेस करतात. अशाच एका प्रेसचा मालक अमन कलाकारांची पर्वा न करता पैशांच्या मागे धावतो, तर त्याच्याकडेच काम करणारा राजा जमिन विकून स्वत: प्रेस सुरू करतो. राजाही तमाशातील स्त्रीच्या मागे लागतो. त्यामुळं अडचणीत सापडलेल्या मेहनती कलाकारांना घेऊन दीपक नवीन प्रेस सुरू करतो. पैसे किंवा मुलीच्या मागे न धावता कलेसाठी स्वत:चं जीवन वेचण्याचं वचन तो नारायणरावांना देतो. आर्थिक आणि मानसिक समाधान न मिळणाऱ्या कलाकारांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतो. त्यानंतर काय होतं ते चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपट बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या भक्कम पटकथेची उणीव भासते. लेखनापासून दिग्दर्शनापर्यंत बऱ्याच ठिकाणी त्रुटी राहिल्यानं चित्रपट आपला मूळ हेतू साध्य करण्यात यशस्वी होत नाही.

विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये झाडीपट्टी ही नाटयसृष्टी खूप प्रसिद्ध आहे. या अंतर्गत कथानक, अभिनय, नृत्य आणि गीत-संगीताच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करणारं नाटक सादर केलं जातं. आजही मुख्य शहरांपासून दूर राहिलेली ही कला सर्वदूर पोहोचवण्याचा हा प्रयत्न असला तरी मनोरंजक मूल्यांच्या अभावामुळं यशस्वी झालेला नाही. यासाठी एका सशक्त पटकथेची गरज होती. बोलीभाषेकडं विशेष लक्ष देण्यात आलं असलं तरी सर्व कलाकार तिथलेच असल्यानं ते फार मोठं वैशिष्ट्य नाही. दोन कंपन्यांमधील संघर्ष, नाट्यमय वळणं आणि रोमांचक प्रसंगांद्वारे खिळवून ठेवणारी पटकथा नसल्यामुळं हा चित्रपट एखाद्या माहितीपटासारखा भासतो. कॅमेरावर्कही त्याच पद्धतीचं आहे. गीत-संगीत वास्तवदर्शी असलं तरी विशेष प्रभावी नाही. चित्रपटाची लांबी दीड तास ठेवण्यात आल्यानं फार कंटाळा येत नाही. आणखी लांबला असता तर मात्र कंटाळवाणा झाला असता.

अभिनय : सर्व कलाकारांनी आपापल्या क्षमतेनुसार अभिनय केला आहे. अजित खोब्रागडेला चांगलं मार्गदर्शन मिळालं असतं तर त्यानं साकारलेला लेखक आणखी प्रभावी झाला असता. नारायणरावांच्या भूमिकेतील दिवाकर गावंडे यांचं काम छोटं असलं तरी त्यांच्या मनातील तळमळ चित्रपटात जाणवते. अश्विनी लाडेकरनंही चांगलं काम केलं आहे, पण नायिका असूनही तिची भूमिका लहान आहे. आसावरी नायडूचा रोल सुरुवातीपासून अखेरपर्यंत असून, तिनं तो अत्यंत साधेपणानं साकारला आहे. काजल रंगाली, अनिल उट्टलवार, निशा धोंगडे या कलाकारांनी चांगल्या प्रकारे साथ केली आहे.

सकारात्मक बाजू : विदर्भात जाऊन झाडीपट्टीतील नाटक पाहण्याची संधी न मिळणाऱ्या प्रेक्षकांना तिथल्या कलाकारांच्या कलेची झलक आणि वास्तव पहायला मिळतं.

नकारात्मक बाजू : वास्तवदर्शी चित्र दाखवण्याच्या प्रयत्नात मनोरंजक मूल्यांचा विसर पडल्यानं एका चांगल्या विषयावर उत्त्तम चित्रपट पहायला मिळत नाही.

थोडक्यात : विदर्भातील बहुचर्चित कलेचा प्रकार नेमका काय असतो हे जाणून घेण्याचं कुतूहल असेल तरच हा चित्रपट पहायला हवा अन्यथा निराश व्हायला होईल.

टॅग्स :सिनेमा