Join us

महात्मा जोतिराव आणि सावित्रीबाई फुलेंवर येणार मराठी चित्रपट,या तारखेला येणार रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 6:06 PM

Marathi Movie On Mahatma Jyotirao Phule and Savitribai Phule: 'महात्मा' हा समीर विद्वांस दिग्दर्शित चित्रपट सामाजिक कार्यकर्ते व थोर समाजसुधारक जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असणार आहे.

दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी धुराळा, डबल सीट, टाईम प्लीज आणि आनंदी गोपाळ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून आता 'महात्मा' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाचे शीर्षक आणि व्हिडीओ प्रदर्शित करून सिनेमाची अधिकृत घोषणा केली आहे.

 

'महात्मा' हा समीर विद्वांस दिग्दर्शित चित्रपट सामाजिक कार्यकर्ते व थोर समाजसुधारक जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. जोतीराव फुलेंनी महिलांना शिक्षण देऊन एक क्रांती घडवून आणली. सावित्रीबाई फुले यांना भारतातील महिला शिक्षणाचे प्रणेते म्हणून संबोधले जाते त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पतीसमवेत महिला हक्क सुधारण्याच्या दृष्टीनेही काम केले.

 

अजय-अतुल ही मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक जोडी या चित्रपटाचे संगीत करणार आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रसिद्ध होईल. 'क्रांतिसूर्य' हा चित्रपट जोतीराव फुलेंच्या आयुष्यावर असणार आहे तर 'क्रांतीज्योती' हा चित्रपट सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यावर असणार आहे.

हा सिनेमा प्रतिसाद आणि ह्युज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला असून रणजित गुगळे आणि अनिश जोग या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अद्याप हा चित्रपट निर्मिती प्रक्रियेत असून अजूनही मुख्य भूमिकेतील कलाकाराचा चेहरा समोर आलेला नाही. त्यामुळे ज्योतीबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत कोणते कलाकार झळकणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.   २०२२ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

 समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केलेला आनंदी गोपाळ चित्रपटालाही रसिकांची प्रचंड पसंती मिळाल होती.चित्रपट हे जरी मनोरंजनाचे माध्यम असलं तरी काही चित्रपट असतात जे मनोरंजनापलीकडे जाऊन कधी आपल्याला अंतर्मुख करतात तर कधी एक अनोखी प्रेरणा देऊन जातात. काही चित्रपट स्तिमित करणारे ठरतात तर काही अंतर्मुखतेचा संथ, समृद्ध अनुभव देणारे ठरतातं ज्यानं समाजात मोठे बदल घडून येतात. असंच एक समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ नं घडवून आणलंय.