Join us

मराठी सिनेमात कथा हीच हिरो, सोकुल अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मांडलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 1:17 PM

विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.

मराठीमधील एक संवेदनशील अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. आपल्या ‘सोकुल’ अभिनयाने सोनालीने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळलं आहे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारत सोनालीने आपल्या अभिनयातील ताकद दाखवली आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही सोनालीने भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. आगामी काळात सोनाली विविध प्रकारच्या भूमिका साकारत आहे. प्रत्येक भूमिका वेगळी आणि खास असल्याने त्याबाबत ती आनंदी आहे. बऱ्याचदा सोनालीचा अभिनय पाहून तिची दिग्गज अभिनेत्रींशी तुलना होते. ती त्या गाजलेल्या अभिनेत्रींची जागा भरून काढेल असं म्हटलं जातं. मात्र त्यांची जागाभरून काढण्यापेक्षा स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं हे महत्त्वाचं असतं असं सोनाली मानते. शिवाय मराठी सिनेमात त्याची कथाच हिरो असते असंही तिने स्पष्ट केले आहे. आगामी काळात अनेक चांगल्या दिग्दर्शकांसह काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद ती लपवू शकली नाही. तिला महिला दिग्दर्शिकांसह काम करायला आवडतं की पुरुष दिग्दर्शकांसह यावरही तिने आपलं परखड मत मांडलं. दिग्दर्शक हा दिग्दर्शक असतो,तो मग पुरुष आहे की महिला हा मुद्दा तितकासा महत्त्वाचा नसतो असंही सोनालीने स्पष्ट केले आहे. मराठी सिनेमात वेगळी ताकद आहे. कथेतील नाविन्य, आशयघन कथा आणि दर्जेदार भूमिका यामुळे अनेकजण मराठी सिनेमाकडे वळत असल्याचे तिनं सांगितलं. 

आपला अभिनय,सौंदर्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.सिनेमात अभिनयाने रसिकांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी ही रिअल लाईफमध्ये उत्तम सायकलिस्ट आणि रनर  असून लवकरच ती ट्रायक्लोशॉनमध्ये सहभागी होणार आहे. सायकलिंग आणि रनिंगची आपली ही आवड जोपासण्यासाठी सोनाली तितकीच मेहनतसुद्धा घेते. खार ते वर्सोवा किंवा वांद्रेपर्यंत ती सायकलिंग करते.आपल्या सायकलिंगबद्दल असणारी आवड सोनाली वेळोवेळी सोशल मीडियावरुन तिच्या फॅन्ससह फोटोंच्या माध्यमातून शेअर करत असते. सर्वजण रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत असताना आपण त्याच दिवशी पहाटे साडेचार वाजता उठून दोन-तीन किमी रनिंग करत असल्याचे सोनालीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी