Join us

Marathi Film Industry: ४१ मराठी चित्रपटांना राज्य सरकारने दिला मदतीचा हात! मिळालं १२ कोटींचं अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 9:53 PM

'दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य' योजनेंतर्गत मिळाला आधार

Sudhir Mungantiwar, Marathi Film Industry: मंत्रालयात आज दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेंतर्गत एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ४१ मराठी चित्रपटांना १२ कोटी ७१ लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हे अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना, 'समाजाला विषारी विचारांपासून वाचविण्याची जबाबदारी चित्रपटसृष्टीची आहे. दर्जेदार आणि आशयघन चित्रपट निर्मितीतून चित्रपटसृष्टीने आपली जबाबदारी पार पाडावी,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफही उपस्थित होते.

"मराठी चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी पूरक आणि पोषण निर्णय घेतले जात असून दर्जेदार आणि आशयघन मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. राज्य सरकार चित्रपटांच्या निर्मितीला बळ देण्यासाठी पाठीशी उभे आहे. राज्यात जास्तीत जास्त चित्रपट तयार व्हावेत आणि ते चित्रपटगृहांमध्ये उत्तम चालावेत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यादृष्टीने राज्यातील नाट्यगृहे ही नाट्यचित्र मंदिर करता येतील का आणि तेथे दिवसभराच्या वेळेत चित्रपट प्रसारित करता येतील का, याचा विचार सुरु आहे," असे सुधीर मुनगंटीवारांनी सांगितले.

"सध्या आपण राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे अनुदान दुप्पट करण्याचा निर्णय घेत आहोत. चित्रपटासाठी देण्यात येणारे अनुदान ३ महिन्याच्या आत देण्याची सूचना विभागाला केली आहे. अधिकाधिक आशयसंपन्न चित्रपट निर्मिती मराठीमधून व्हावी, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. कोल्हापूर येथील चित्रनगरीचा विकास त्यादृष्टीने आपण करत आहोत, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. मागील दोन महिन्यापूर्वी 15 सदस्यांची चित्रपट परीक्षण समिती राज्य शासनाने गठीत केली. चित्रपट क्षेत्रातील जाणकार, तज्ज्ञ मंडळींचा त्यामध्ये समावेश केला आहे. त्यामुळे पारदर्शी पद्धतीने जलदगतीने चित्रपटांचे परीक्षण होऊन अनुदान पात्र चित्रपटांना अनुदानाची कार्यवाही पूर्ण होईल", असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले की, मराठीमध्ये अनेक गुणी कलाकार असून मराठी मध्ये दर्जेदार चित्रपटनिर्मिती होत आहेत. तर मराठी भाषेत अधिकाधिक अ वर्ग दर्जाचे चित्रपट तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आव्हानांना संधीत रुपांतरीत करण्याचे काम चित्रपट निर्मात्यांसोबतच राज्य शासन करणार असल्याचे मत अधिकारी वर्गाकडून मांडण्यात आले.

४१ चित्रपटांना अनुदान वाटप

४ चित्रपटांना “अ” दर्जा तर “३३” चित्रपटांना “ब” दर्जा प्राप्त झाला असून त्यांना अनुदान वाटप करण्यात आले. मुरंबा, बंदीशाळा, पितृऋण आणि भोंगा या ४ चित्रपटांना अ दर्जा देण्यात आला. विविध राज्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असल्याने या चित्रपटांना शासन धोरणानुसार अ दर्जा देऊन अनुदान वितरीत करण्यात आले. तसेच, शिवराज्याभिषेकाच्या अर्धत्रिशतसांवत्सरिक महोत्सवाच्या आयोजना संदर्भात चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनीही आपल्या सूचना द्याव्यात असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.

टॅग्स :मराठी चित्रपटसुधीर मुनगंटीवारमहाराष्ट्र