मराठी चित्रपटांनी बदलली एंटरटेन्मेंटची व्याख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:09 AM
सध्या मराठी चित्रपटांत अनेक वेगवेगळे विषय घेऊन प्रयोग केले जात आहेत. मला हे खरोखरच कौतुकास्पद वाटतं. कारण बदल स्वीकारण्याची ...
सध्या मराठी चित्रपटांत अनेक वेगवेगळे विषय घेऊन प्रयोग केले जात आहेत. मला हे खरोखरच कौतुकास्पद वाटतं. कारण बदल स्वीकारण्याची लोकांची मानसिकता नसते किंवा बदल म्हणावा तितक्या लवकर स्वीकारला जात नाही. पण, चित्रपट अशा वेगळ्या विषयांवर आपल्याला केवळ विचारच नाही करायला लावत, तर काही चुकत असेल तर ते बदलण्याची भूमिकाही घ्यायला भाग पाडतो. तेच तेच चित्रपट बघण्यापेक्षा त्या मानसिकतेत बदल करायला लावतो, नवीन विषय बघायला प्रवृत्त करतो. याचे श्रेय निश्चितच चित्रपटांना द्यायला पाहिजे. कारण ते म्हणावं तितकं सोपं नसतं, पण गरजेचं असतं असं म्हणायला काही हरकत नाही.एक काळ असा होता, की जेव्हा फक्त कॉमेडी चित्रपटच मराठी इंडस्ट्रीमध्ये तयार होत होते. त्यामुळे मराठी चित्रपट म्हणजे काय तर कॉमेडी असा समज प्रेक्षकवर्गात तयार होऊ लागला होता. पण श्वास, जोगवा, शाळा असे काही चित्रपट आले आणि त्यांनी हा समज दूर करायचे मोलाचे कार्य केले. कारण या चित्रपटांनी एकीकडे मनोरंजन तर केलेच पण दुसरीकडे एक सामाजिक संदेशही दिला. माझ्या मते एंटरटेन्मेंट या शब्दाचा अर्थ मनोरंजन म्हणजे चित्रपट बघितला, आनंद घेतला, सोडून दिला इथवरच र्मयादित नाहीये.तर एखादा चित्रपट जेव्हा आपल्या मनाला काहीतरी विचार करायला लावतो, आपल्या रोजच्या कामातून तीन तास वेळ काढून आपण चित्रपटगृहात जातो आणि तो चित्रपट आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो त्याला मनोरंजन असं म्हटलं पाहिजे. मग ती केवळ विनोदी चित्रपटांपुरतीच सीमित राहत नाही.त्यामुळे मराठी चित्रपटांनी एंटरटेन्मेंटची व्याख्या बदलण्यात मोलाचा हातभार लावला आहे, असंच म्हणायला पाहिजे. ती आली, गायली, अभिनयही केला. मराठीतील माईलस्टोन बनलेल्या 'टाइमपास' चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत तिने दगडूलाच नाही, तर तमाम प्रेक्षकवर्गाला जिंकले. ती म्हणजे केतकी माटेगावकर. केतकीला आपण सगळ्यांत पहिल्यांदा पाहिले आणि ऐकले ते 'सा रे ग म पा' च्या लिटिल चॅम्प्सच्या कॉम्पिटिशनमध्ये. तेथे आपल्या आवाजाची जादू तिने सर्वांवर केली. शालेय शिक्षण सुरू असताना तिने गाण्याचे सूरही तितक्याच ताकदीने पेलले. फिर से चमके टिम टिम तारे, सुन जरा या हिंदी, तर एकली तू लाजूनी, अजूनही सांजवेळी, तारा तारा, अरे संसार संसार या गाण्यांसाठी पार्श्वगायिकेचा आवाजही दिला. तर दुसरीकडे शाळा, आरोही, काकस्पर्श, तानी, टाईमपास, टाईमपास 2 या गाजलेल्या आणि बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवलेल्या चित्रपटांत तिने वेगवेगळ्या भूमिकेतील मुख्य नायिका साकारली. तिच्या या गाण्यापासून अभिनयापर्यंतच्या प्रवासात आलेले अनुभव तिने 'सीएनएक्स'शी बोलताना शेअर केले.