वर्षाच्या सुरुवातीलाच सुरू झालेली कॉन्ट्रोव्हर्सी आणि इतर चित्रपटांशी स्पर्धा करत यंदा १०० मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटांवर निर्मात्यांनी जवळपास २६० कोटी रुपये खर्च केले, पण त्यातून ४० टक्क्यांपेक्षाही कमी म्हणजे केवळ १०० कोटी रुपयांचीच कमाई झाली. त्यामुळे २०२३मध्ये किती चित्रपट रिलीज होणार आणि ते किती कोटींची उलाढाल करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
२०२२मध्ये जानेवारीत ५, तर फेब्रुवारीत तब्बल १३ चित्रपट रिलीज झाले. परिक्षांचा काळ, ‘द काश्मिर फाईल्स’ आणि ‘आरआरआर’ची हवा झाल्याने मार्चमध्ये केवळ २ चित्रपट प्रदर्शित झाले. एप्रिलमध्ये ९, मेमध्ये १६, जूनमध्ये ११ असे तीन महिन्यांमध्ये ३६ चित्रपट आले. जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्येकी ६, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी ८, नोव्हेंबरमध्ये १० आणि डिसेंबरमध्ये ८ असे एकूण १०० चित्रपट यंदा प्रदर्शित झाले. याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे सीओपी २६० कोटी रुपये आहे. १०० चित्रपटांमधून केवळ ७ चित्रपटांनी प्रेक्षकांची पसंती मिळवत उत्तम व्यवसाय केला. या चित्रपटांनी तिकिटबारीवर ५५ कोटी रुपयांच्या आसपास बिझनेस केला. सॅटेलाईट विक्रीतून मिळालेले २० कोटी पकडून ७ चित्रपटांनी जवळपास ७५ कोटी रुपये कमावले. उरलेल्या ९३ चित्रपटांनी अंदाजे २० ते २५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. १०० चित्रपटांनी २६० कोटींमधून १०० कोटी रुपये रिकव्हर केले. हा आकडा ४० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. या वर्षी उणीव भरून काढण्यासाठी मराठी सिनेसृष्टी सज्ज झाली आहे.
हॉलिवूडपटांसोबतच हिंदी-साऊथ सिनेमांचे आक्रमण, सॅटेलाईटच्या घसरलेल्या किंमती आणि थिएटरकडे मराठी प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ यामुळे मराठीचा बिझनेस घसरत आहे. या वर्षी चित्रपटांची संख्या कमी होऊन ८०च्या आसपास पोहोचेल असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. कोरोना काळात अडकलेले सिनेमे येतील, पण २० टक्क्यांचा फटका मराठी चित्रपटांना बसू शकतो असा तज्ज्ञांचे मत आहे. या वर्षी मोठ्या बजेटचे चित्रपट जास्त असल्याने गुंतवणूक १५-२० टक्क्यांनी वाढून मराठी सिनेसृष्टी ३०० कोटी रुपयांच्या आसपास पोहोचेल. सध्या निर्मितीखर्च वाढला असून, चित्रपट भव्य बनवण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. त्यामुळे ही स्पर्धा छोट्या निर्मात्यांसाठी त्रासदायक ठरून काहीजण बाद होण्याची शक्यता आहे. वीर दौडले सात, सुभेदार, धर्मवीर २, रावरंभा हे चित्रपट बिग बजेट आहेत. पहिल्या पाच-सहा महिन्यांचे चित्र पाहता ५-६ चित्रपट चांगला बिझनेस करतील अशी अपेक्षा आहे.
आघाडीवर - पावनखिंड, सरसेनापती हंबीरराव, शेर शिवराज, धर्मवीर, चंद्रमुखी, शिवप्रताप गरुडझेप, मी वसंतराव पिछाडीवर - पांघरुण, अनन्या, गोष्ट एका पैठणीची, आपडी थापडी, बालभारतीफुसका बार - टाईमपास ३, दे धक्का २, टकाटक २, दगडी चाळ २, बॉईज ३प्रेक्षकांची पाठ - झोंबिवली, मीडियम स्पायसी, ३६ गुण, एकदा काय झालंवादग्रस्त - ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या रूपात २०२२मधील पहिला वाद सुरू झाला. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात ‘हर हर महादेव’ ही वादाच्या भोवऱ्यात सापडला. चुकीचे ऐतिहासिक संदर्भ दाखवल्याने भावना दुखवल्याचा आरोप या चित्रपटावर झाला.
१८ चित्रपटांच्या तारखा घोषितजानेवारीत - सुर्या, टिफीन टाईम, वाळवी, व्हिक्टोरीया, साथ सोबत, सरला एक कोटी, बांबू, फेब्रुवारीत - टिडीएम, गडद अंधार, बाईपण भारी देवा, आलंय माझ्या राशीला, जग्गू आणि ज्युलिएट, ढिशक्यांव, टर्री, मार्चमध्ये गुढीपाडव्याला - फुलराणी, एप्रिलमध्ये - रावरंभा, महाराष्ट्र शाहीर, मेमध्ये - मुसंडी या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख घोषित झाली आहे.