Join us  

Ramesh Deo : काकांना असं शांत झोपलेलं पहिल्यांदाच पाहिलंय; रमेश देव यांच्या आठवणी सांगताना पूजा साळुंखे भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 4:54 PM

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं झालं निधन.

उत्फुल्लतेचा झरा असलेले, सर्व प्रकारच्या भूमिका लीलया साकारणारे, मनोरंजनाच्या सर्व माध्यमांतून रसिकमान्यता लाभलेले सदाबहार अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी रात्री ८.३०च्या सुमारास कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा, अभिनेते अजिंक्य आणि निर्माता-दिग्दर्शक अभिनय ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ३० जानेवारी रोजी कुटुंबीयांसह वाढदिवस साजरा केला होता. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अभिनेत्री पूजा साळुंखे यांनीदेखील रमेश देव यांच्याबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

"काकांना असं शांत झोपलेलं पहिल्यांदाच पाहिलंय. सर्जाच्या वेळी त्यांची तळमळ मी पाहिली आहे. त्यांचा काम असंच झालं पाहिजे असा त्यांचा हट्ट असायचा. त्यांनी सर्जासारखा उत्कृष्ठ चित्रपट तयार केला. पहिलाच नायिकेचा चित्रपट मला काकांकडून मिळाला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं नाव मनिषा पवार आहे. पण मला चित्रपटाच्या निमित्तानं पूजा हे नाव काकांनी दिलं होतं. त्यांचं आडनाव देव असलं तरी ती खरंच देव माणसं आहेत. त्यांची मी खुप ऋणी आहे," अशी भावना पूजा साळुंखे यांनी व्यक्त केली.

रमेश देव यांचा प्रदीर्घ प्रवासशेकडो हिंदी आणि मराठी चित्रपट, मराठी नाटके, तसेच टीव्ही मालिका, अनेक जाहिराती असा रमेश देव यांचा प्रदीर्घ प्रवास आहे. ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी मराठीत, आरती या राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटातून हिंदीत पदार्पण केले. खलनायक, नायक, सहनायक आदी व्यक्तिरेखा ते सहजतेने साकारत असत. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेद्र या अभिनेत्यांसह त्यांनी पडदा गाजविला. आनंद, आप की कसम, मेरे अपने, ड्रीम गर्ल या सिनेमातील त्यांच्या व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस उतरल्या. मराठीत जेता, वासुदेव बळवंत फडके, सुवासिनी, जगाच्या पाठीवर, माझा होशील का, असे शेकडो चित्रपट त्यांनी केले.

टॅग्स :रमेश देव