काल केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांमधून ही मागणी करण्यात येत होती. अखेर काल केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. या ऐतिहासीक आणि आनंदाच्या प्रसंगी लोकप्रिय मराठी दिग्दर्शक-अभिनेता क्षितीज पटवर्धनने खास पोस्ट लिहिली आहे.
क्षितीजने सोशल मीडियावर केली पोस्ट
क्षितीज पटवर्धनने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल.आता आपली मराठी बोलण्याची, वाचण्याची, पाहण्याची, जपण्याची जबाबदारी वाढलीय.फक्त उत्सव नाही जगण्यात मराठी आणूया.फक्त प्रमाण नाही बोलीत मराठी सजवूया.फक्त जुनं नाही नवीन कला, साहित्य घडवूया.फक्त जपणूक नाही मराठी चौफेर वाढवूया.
अशी पोस्ट करुन क्षितीजने मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल केल्याप्रकरणी आनंद साजरा केलाय. क्षितीजच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी आणि चाहत्यांनी पोस्ट करुन आनंद व्यक्त केलाय.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल
काल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही आनंदाची गोष्ट सर्वांना सांगितली. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच भारतीय भाषांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आपल्याकडे आतापर्यंत तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा होता. आता आज मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांनाही अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे." या निर्णयानंतर मराठी माणसांनी आणि अनेक कलाकारांनी आनंद व्यक्त केलाय.