Join us

बापलेक नाही तर 'बापल्योक' हे नाव का? दिग्दर्शक मकरंद मानेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 2:50 PM

मुलगा आणि बापाच्या नात्यावर सिनेमाची कथा आधारित आहे.

दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने (Makrand Mane) आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) एका सिनेमासाठी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. 'कागर' फेम दिग्दर्शक मकरंद माने 'बापल्योक' (Baaplyok) हा सिनेमा घेऊन आले आहेत. मुलगा आणि बापाच्या नात्यावर सिनेमाची कथा आधारित आहे. मात्र सिनेमाचं नाव बापलेक नाही तर 'बापल्योक' का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याचंच उत्तर दिग्दर्शक मकरंद मानेंनी दिलं आहे.

शशांक शेंडे (Shashank Shende) यांची मुख्य भूमिका असलेला 'बापल्योक' सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होत आहे. नेहमीच दर्जेदार विषय मांडणारे दिग्दर्शक म्हणून मकरंद माने ओळखले जातात. तसंच शशांक शेंडे मराठीतील कसदार अभिनेते आहेत जे वडिलांची भूमिका साकारत आहेत.  बापल्योक असं सिनेमाचं नाव का ठेवलं यावर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मकरंद माने म्हणाले, 'गावाकडे बोलताना बाप आणि पोरगा असं बोललं जात नाही. तर ल्योक असंच बोललं जातं. कुठं चालले बापल्योक? ती बोली आहे. या बोलीला अनुसरुन आम्ही तोच शब्द निवडला. सिनेमासाठी हा शब्द खूपच योग्य होता.'

बापलेकाच्या नात्यावर आजवर फारसे भाष्य करण्यात आलेले नाही. या चित्रपटाच्या आणि या गीताच्या निमित्ताने बाप लेकाचा प्रवास 'उमगाया'ची मिळणारी संधी प्रत्येकाला समृद्ध करणारी असेल असा विश्वास दिग्दर्शक मकरंद माने व्यक्त करतात. नागराज मंजुळे हे सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. येत्या शुक्रवारी 25 ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :मराठी चित्रपटनागराज मंजुळेमराठी अभिनेता