अभिनेता, दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बाईपण भारी देवा हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. ६ बहिणींची कथा सांगणाऱ्या या सिनेमाने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची गर्दी खेचली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये या सिनेमाने तब्बल 12.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. इतकंच नाही तर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण या सिनेमाविषयी प्रतिक्रिया देत आहे. यामध्येच अभिनेता संजय मोने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सिनेमाविषयी आणि त्यातील कलाकारांविषयी भाष्य केलं आहे.
काय आहे संजय मोनेंची पोस्ट?
बाईपण भारी देवा-सध्या हा मराठी चित्रपट उत्कृष्ट गर्दीत असंख्य चित्रपट गृहात सुरु आहे. माझी बायको सुकन्या कुलकर्णी आणि माझी मुलगी जुलिया (आईच्या तरुण वयातले एक दृष्य त्यात तिने साकारले आहे) त्यात काम करते आहे म्हणून मी तो पाहायला गेलो. माझ्या मते चित्रपट हे मुख्यत्वे मनोरंजनासाठी असतात. कारण गर्दीने एकत्र येऊन बघण्याचा तो एक कार्यक्रम असतो.सोहळा खरं तर. प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे याचा अंदाज चुकू शकतो,पण हल्ली प्रामुख्याने समाज माध्यमांवर उत्तम प्रतिक्रिया कशामुळे येतील याचा अंदाज बांधून चित्रपटाची आखणी होते.घरचा विद्यार्थी साठ सत्तर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला,जे हल्ली पुढील अभ्य्यासाकरता अतिशय तुटपुंजे ठरतात,तरीही घरचे पेढे वाटून आनंद साजरा करतात तद्वत फेसबुक आणि इन्स्टाग्राम वरती कौतुक झाले कि निर्माते आणि दिग्दर्शक यांना अस्मान ठेंगणे होते. कलाकार बिचारे हुरळून जाण्यासाठीच जन्माला आले असतात. याचा अर्थ समाज प्रबोधनत्मक चित्रपट निर्माण होऊच नयेत असं नाही.पण त्या बाबतीत तारतम्य बाळगलं पाहिजे. स्व.बिमल रॉय यांनी सुजाता,बंदिनी,सीमा सारखे असे चित्रपट निर्माण केले ज्यात प्रबोधन होतंच पण मनोरंजन होईल असा भाग त्यात प्रामुख्याने होता.उत्तम संगीत होते,संवाद होते अभिनय होता. बाईपण भारी ह्या चित्रपटाने नेमके हेच साधले आहे.आणि लोकांना काय हवं असेल याचा त्या निर्मात्या-दिग्दर्शकाचा अंदाज अचूक ठरला. सर्वसाधारण इतर चित्रपटांची होते तशीच त्याची जाहिरात केली गेली काहीही आगळं वेगळं त्यात नव्हतं.पण लोकांनी तो पाहिला आणि इतरांकडे त्याची शिफारस केली परिणामी तो चित्रपट आज गर्दी खेचतो आहे. सर्व प्रथम उत्तम संहिता लिहिणा-या लेखकाचे अभिनंदन .काय असं आहे त्या संहितेत? सहा बहिणींची कथा.त्यांचे आपसात संबंध काहीसे ताणलेले.जे आपल्याला हल्लीच्या कुटुंबात पाहायला मिळतात.एकत्र कुटुंब पद्धती नसण्याच्या काळात लेखक तुम्हाला त्याचा कुटुंब शरीराने एकत्र नसतांनाही एकवटले पणाचा अनुभव देतो.लांब लांब राहणा-या भावंडांना मायेचा ओलावा म्हणजे काय हे चित्रपट दाखवून देतो.सगळ्या बहिणी कुठल्या कारणांमुळे एकत्र येतात ते कारण फार सुंदर पद्धतीने लेखकाने बेतले आहे, असं संजय मोने म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "आता दिग्दर्शक केदार शिंदे. तो वयाने माझ्यापेक्षा लहान आहे तरीही तो मला मनाने वागवतो याबद्दल त्याचे आभार.केदारच्या चित्रपटात गीतं ही नेहमीच एक ठळक वैशिष्टय ठरत आलेलं आहे.आणि असणारच कारण वारसा आहे.सरळ सोप्या आणि तरीही खास जागा असलेलं दिग्दर्शन त्याने केलं आहे.लआजही स्त्रियांना त्यांच्या ख-या ख-या भावना प्रकर्षाने प्रकट करता येत नाहीत आणि कुणीतरी त्या चित्रपटातून दर्शवून दिल्या कि त्यावर प्रेक्षकांच्या उड्या पडणार हे नक्की.(अमिताभ बच्चन दहा गुंडांना लोळवून काढायचा.सामान्य माणसाला तसं करायची इच्छा होत असते पण आपण नाही तर कोणीतरी ते करतोय मग चला बघायला!या कारणांमुळे त्यांचे चित्रपट गाजले.)ते जसे angry young man होते तशाच या चित्रपटाच्या सगळ्या नायिका आहेत जे आपल्यावरील होणारा कमी अधिक अन्याय सहन करत बसत नाहीत.तर त्यावर उत्तर शोधून काढतात. सर्वच्या सर्व कलाकार उत्तम काम करतात. वंदना,रोहिणी वयाने जरा माझ्याहून मोठ्या तर सुकन्या,शिल्पा,दीपा,सुचित्रा ह्या लहान पण सगळ्या मैत्रिणीच आहेत. त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेला वेगळी किनार केदारने फार सुंदर रीतीने दिली आहे.संगीत उत्तम आहे.इतर तांत्रिक अंगही उत्कृष्ठ. सगळ्यात शेवटी नायक प्रधान चित्रपट व्यवस्थेत संपूर्ण नायिका प्रधान चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल निर्मात्यांचे आभार.अगदी जरूर जरूर बघावा असा हा चित्रपट आहे. नाव जरी बाईपण भारी देवा असं असलं तरी पुरुषांनीही जरूर बघा.
ता.क. १) सध्याची गर्दी आणि तिकिटांसाठी उडणारी झुंबड बघता एक दिवस सर्व कचे-या बंद ठेऊन नोकरदार आणि व्यावसायिक यांना चित्रपट बघायची सोय करावी. २)खरं तर ऐन उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता.पाहिल्यानंतर अनुभवायला मिळणारी शीतल झुळूक एप्रिल-मे-जून सुखावह करून गेला असता . पुन्हा एकदा सगळ्यांचे अभिनंदन आणि निर्माता-दिग्दर्शक यांचे विशेष आभार."
दरम्यान, बाईपण भारी देवा हा सिनेमा ३० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमामध्ये रोहिणी हट्ट्ंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दीपा परब आणि सुचित्रा बांदेकर यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे.