Join us  

शत्रूंनी चाल केल्यावर त्यांना यमसदनी धाडणारा तो पुन्हा येतोय..! 'भूपती' चित्रपटाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 4:33 PM

आगामी मराठी चित्रपट भूपती सिनेमाची शानदार घोषणा करण्यात आलीय. या सिनेमात इतिहासातलं एक सुवर्णपान रुपेरी पडद्यावर साकार होणार आहे (bhupati)

मराठी मनोरंजन विश्वात यावर्षी विविध विषयांवरील सिनेमे लोकांच्या भेटीला येणार आहेत. गेल्या काही दिवसांत ओले आले, अल्याड पल्याड, पंचक, संघर्षयोद्धा, नाच गं घुमा असे नवनवीन विषयांवरील हटके सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता याच सिनेमांमध्ये भूपती या आणखी एका सिनेमाची भर पडणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण भूतकाळात जाऊन संशोधन करतोय म्हणूनच शेकडो, हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आजकाल आपल्याला समजतोय. खरंतर खूप मागे जाऊन हे संशोधन होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच एक महत्त्वाचा प्रयत्न दिनिशा फिल्म्स प्रा.लि.यांच्या आगामी 'भूपती' या मराठी चित्रपटातून होणार आहे.

घनदाट जंगलातील रहस्य भूपती

नुकतीच या भूपती चित्रपटाची घोषणा झाली असून त्याचे आकर्षक पोस्टर आणि मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन दिनेश जगताप करीत असून निर्मिती यशराज जगताप यांची आहे. छायांकन मंगेश गाडेकर करणार आहेत. ‘हजारॊ वर्षांपासूनच या घनदाट जंगलातलं त्यांचं राज्य देवभूमी... जेव्हा जेव्हा शत्रूंनी चाल केली तेव्हा तेव्हा त्यांना यमसदनी धाडलंय… तोच पुन्हा येतोय..! असा भारदस्त आवाज आणि ऐतिहासिक वास्तूमधील एक दिव्यमूर्ती ‘भूपती’च्या मोशन पोस्टरमध्ये पहायला मिळते आहे. 

कधी होणार सिनेमा रिलीज?

इतिहासातील एक सुंदर गोष्ट जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच मनोरंजन व सामाजिक प्रबोधन ‘भूपती’ या  चित्रपटातून होईल याची मला खात्री आहे, असं दिग्दर्शक दिनेश जगताप म्हणाले.  जगाच्या पाठीवर सर्वप्रथम जी वास्तू निर्माण झाली व पुढे त्याच्यासारख्या अनेक वास्तू निर्माण करून त्यांच्या मदतीनेच आपल्या पूर्वजांनी जो दैदीप्यमान इतिहास घडविला, त्यातलंच एक  सुवर्णपान म्हणजे ‘भूपती’.  या सिनेमात कोणते मराठी कलाकार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. २०२५ ला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :मराठी चित्रपटमराठीमराठी अभिनेता