दर्जेदार आशयाने परिपूर्ण असलेला नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी दिग्दर्शित 'बोगदा' या सिनेमाची दखल आता जागतिकस्तरावरदेखील घेतली जाणार आहे. महाराष्ट्रात मिळालेल्या घवघवीत यशानंतर 'फिल्मीदेश या उपक्रमांतर्गत 'बोगदा' सिनेमा भारताबाहेरील देशातदेखील मोठ्याप्रमाणात प्रदर्शित केला जाणार आहे. मराठी चित्रपटांची अंतरराष्ट्रीय स्तरावर व्याप्ती वाढवणाऱ्या 'फिल्मिदेश' मुळे 'बोगदा' सिनेमाचा सकस आशय युएस, युके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांसारख्या विविध देशांतील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
इतकेच नव्हे तर, 'बोगदा' सिनेमाने 'ऑस्कर' या सर्वोत्कृष्ट पुरस्कारामधील भारतातील प्रादेशिक चित्रपटांच्या निवडस्पर्धेत सहभाग घेतला असून, इफ्फी महोत्सवाच्या निवडप्रक्रियेसाठीदेखील त्याने आपली दावेदारी सिद्ध केली आहे. शिवाय, नुकत्याच पार पडलेल्या ७५ व्या वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अंतिम निवडप्रकीयेपर्यंत 'बोगदा' सिनेमा पोहोचला होता. या महोत्सवामध्ये सामील झालेल्या भारतातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक सिनेमाविरुध्द 'बोगदा'ने अतितटीची झुंज दिली होती. त्याबाबत, वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरी मेम्बर्सकडून या सिनेमाला खास प्रशंसापत्रकही देण्यात आले आहे. अश्याप्रकारे देशात आणि परदेशात कौतुकास पात्र ठरत असलेला हा सिनेमा 'फिल्मीदेश' या उपक्रमांतर्गत जगभरात प्रदर्शित होणार आहे. मृण्मयी देशपांडे, सुहास जोशी आणि रोहित कोकाटे यांची प्रमुख असलेल्या या सिनेमाची निर्मिती दिग्दर्शिका निशिता केणी, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांनी केली आहे.