लोकप्रिय अभिनेता,दिग्दर्शक आणि निर्माता अशा अनेक भूमिका एकाच वेळी वठवणारा लोकप्रिय कलाकार म्हणजे महेश मांजरेकर. मराठीसह बॉलिवूडमध्येही महेश मांजरेकरांनी त्यांचा जम बसवला आहे. त्यामुळे कलाविश्वातील प्रसिद्ध व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे कलाविश्वाला अनेक दर्जेदार सिनेमे देणाऱ्या महेश मांजरेकरांनी कर्करोगासारख्या असाध्य आजाराशी सामना केला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या या संघर्षावर भाष्य केलं.
महेश मांजरेकर कायम त्यांच्या धाडसी आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असतात. असाच लढा त्यांनी कर्करोगासोबतही दिला. सलमान खानच्या अंतिम या सिनेमाचं शुटिंग सुरु असताना महेश मांजरेकर यांना कर्करोगाचं निदान झालं. परंतु, त्यांनी कधीही या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ दिला नाही. कर्करोगाचा त्रास होत असतानाहीत्यांनी बिग बॉस ३च्या पर्वाचा प्रोमो शूट केला होता.
''बिग बॉस मराठी 3' (bigg boss marathi 3) च्या प्रोमो शूटचा दिवस आजही माझ्या लक्षात आहे. शूट सुरु असताना मला प्रचंड वेदना होत होत्या. तरीही मी जिद्दीने आणि प्रामाणिकपणे शूट पूर्ण केलं. शुटिंगच्या वेळी माझ्या शरीरात अनेक ठिकाणी नळ्या लावल्या होत्या. त्यामुळे या नळ्या दिसू नयेत यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. गेल्या काही वर्षांपासून मी सिनेसृष्टीत काम करत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मला हे शूट पूर्ण करायचं होतं. मला त्यावेळी ज्या शारीरिक वेदना होत होत्या त्याविषयी माझी काहीच तक्रार नाही", असं महेश मांजरेकरांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
पुढे ते म्हणतात," मला कर्करोगाचं निदान झाल्यानंतर सलमानने मला विदेशात जाऊन उपचार घ्यायचा सल्ला दिला होता. पण,माझा मुंबईतील डॉक्टरांवर विश्वास होता म्हणून मी इथेच उपचार घेतले."