कोरोनाच फटका आज सर्वच क्षेत्राला बसला आहे. शेतकरीसुद्धा यातून सुटलेला नाही. लॉकडाऊनच्या काळात वेळेचा सदुपयोग करून काहीतरी वेगळे करुयात या विचाराने प्रेरीत झालेल्या एका युवा शेतकऱ्याने वेगळी वाट चोखाळत भारतात फारसे प्रचलित नसलेल्या ‘पॅडी आर्ट’च्या माध्यमातून आगामी प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे पोस्टर गव्हाच्या शेतात साकारले आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात पिंपळगाव या ठिकाणी 90 बाय 45 फुट एवढ्या मोठ्या आकाराची कलाकृती साकारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श, प्रेरणा मानणारे युवा शेतकरी अभयसिंह आडसुळ यांच्या संकल्पनेतून तेथील जिल्हा परिषद शाळेत कलाशिक्षक असलेल्या कुंडलीक राक्षे, तसेच शिवप्रेमी अक्षय पोते यांनी या पोस्टरला 20 दिवसांच्या परिश्रमातून मूर्त स्वरूप दिले आहे. लॉकडाऊन, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा संकटकालात एक सकारात्मक विचार करून एका युवा शेतकऱ्याने, कलाशिक्षकाने साकारलेले हे ‘पॅडी आर्ट’ सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार हे नक्की.
ही कलाकृती बघितल्यानंतर प्रविण तरडे यांनी आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवर लिहिले आहे की, ‘’ अभयसिंह अडसूळ या शेतकरी मित्राच्या संकल्पनेतून कुंडलिक राक्षे या शेतकऱ्याने गव्हाची अशी शेती केली .. याला बहुदा ग्रास आर्ट म्हणतात .. कुंडलिक मी तुला ओळखत नाही पण माझा शब्द आहे तुला , तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार ..’’