महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा असलेला 'सत्यशोधक' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा सिनेमा रिलीज झाल्यापासून प्रेक्षक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे हा सिनेमा अल्पावधीत लोकप्रिय ठरल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चर्चेत येत असून थेट पाचव्या आठवड्यातही तो यशस्वीरित्या वाटचाल करत आहे.
हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच त्याच्या ट्रेलर, टीझर आणि कलाकारांच्या लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. आपल्या देशासाठी, देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी ज्या ज्या व्यक्तींनी कष्ट उपसले, अनेक हालअपेष्टा भोगल्या त्यांचा इतिहास देशातील नव्या पिढीला, लहान मुलांना कळावा या उद्देशाने हा सिनेमा तयार करण्यात आला. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी ठरला असून अनेक प्रेक्षक त्यांच्या लहान मुलांना घेऊन हा सिनेमा पाहायला येत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची ओळख जागतिक पातळीवर झाली आहे. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन आणि ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे रेड कार्पेट प्रीमियर सोहळा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहे. त्यामुळे परदेशातही हा चित्रपट प्रदर्शित होईल.
या सिनेमामध्ये अभिनेता संदिप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबतच या सिनेमात गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.समता फिल्म्स निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित, या चित्रपटाची निर्मिती प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ यांनी केली आहे.