Join us  

तूच माझा प्राण सखा..तूच माझा पाठीराखा..! 'विठ्ठला तूच' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 4:29 PM

तूच माझा प्राण सखा..तूच माझा पाठीराखा..! अशी टॅगलाईन असलेल्या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणाऱ्या या विठ्ठलाचे करावे तितके कौतुकच. विठ्ठलाप्रमाणेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठल शिंदेचा खडतर प्रवास 'विठ्ठला तूच' या नव्या कोऱ्या प्रेममय कथेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. विठ्ठला तूच असे आपण जेव्हा आपल्या भगवान विठ्ठलाला म्हणतो तसे या चित्रपटातील नायकाला ही कथेने विठ्ठला तूच असे म्हणायला भाग पाडले आहे. तूच माझा प्राण सखा..तूच माझा पाठीराखा..! अशी टॅगलाईन असलेल्या   चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून चित्रपटाचे पोस्टर पाहता पोस्टरवरील व्यक्ती नेमकी कोण आहे हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडला असेल, तर पोस्टरवरील व्यक्ती ही नवोदित अभिनेता योगेश जम्मा असून त्याचा 'विठ्ठला तूच' हा पहिलाच चित्रपट आहे. 

 'विठ्ठला तूच' या चित्रपटाची कथा रोमँटिक असून चित्रपटात विठ्ठला म्हणजेच योगेशचा एकंदरीत प्रवास, आणि त्या दरम्यान जुळून आलेलं त्याच प्रेम आणि त्यानंतर जुळलेल्या प्रेमाचा प्रवास पाहायला मिळणार आहे. तसेच  नुकतेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे पोस्टर पाहता पोस्टरवर योगेशचा रावडी लूक पाहायला मिळत आहे. गावाकडील वातावरणात चित्रित झालेला हा चित्रपट गावरान प्रेमाचा माहोल नक्कीच करेल यांत शंकाच नाही, त्यात योगेशचा रावडी लूक आणि त्याने मांडलेली प्रेमाची परिभाषा पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. या चित्रपटात योगेशसह आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा हर्षित अभिराज यांनी पेलली असून दमदार गाणी प्रेक्षकांना पाहणे या चित्रपटात रंजक ठरेल. तर चित्रपटातील सुंदर क्षण झिंगाडे ब्रदर्स यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

रोमँटिक चित्रपटाची चलती थोडीशी कमी झालेली असताना पुन्हा एकदा 'विठ्ठला तूच' हा चित्रपट प्रेममय भावना मोठ्या पडद्यावर व्यक्त करण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास लवकरच सज्ज होत आहे. तसेच चित्रपटात आणखी कोणते कलाकार प्रेमाचे रंग दाखवणार हे लवकरच प्रेक्षकांना कळेल. 

टॅग्स :सिनेमा