Join us

राष्ट्रीय पुरस्काराच्या दिवशी 5 तास उपाशी होती 2 महिन्यांची लेक; सावनी रविंद्रने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 3:19 PM

Savaniee Ravindrra: २ महिन्यांची लेक होती ५ तास उपाशी; राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारत असताना सावनीची झाली होती घालमेल

मराठी कलाविश्वातील गुणी आणि तितकीच गोड आवाज लाभलेली गायिका म्हणजे सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra). उत्तम आवाजाच्या जोरावर सावनीने अनेक सिनेमांना सुंदर गाणी दिली. यात सध्या ती बाईपण भारी देवा या सिनेमामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमात तिने गायलेले मंगळागौरीचं गाणं सध्या तुफान लोकप्रिय होत आहे. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलत असताना तिने तिच्या डिप्रेशनच्या काळावर भाष्य केलं.

'बार्डो' या सिनेमातील 'रान पेटलं' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून 67 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सावनीला गौरवण्यात आलं. परंतु. हा पुरस्कार स्वीकारत असताना तिची द्विधा मनस्थिती झाली होती. कारण, एकीकडे ती पुरस्कार स्वीकारत असताना दुसरीकडे तिची २ महिन्याची लेक तब्बल ५ तास उपाशी होती. त्यामुळे या काळात आलेल्या डिप्रेशनविषयी तिने भाष्य केलं.

काय म्हणाली सावनी?

"तेव्हा माझं मलाच कळत नव्हतं. खऱं तर मी आनंदी व्हायला हवं होतं कारण, मला राष्ट्रीय पुरस्कार मिळत होता. तो स्वीकारायला मी गेले होते. माझ्या आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण होत होतं. पण, त्या डिप्रेशनमुळे  मला त्याचा आनंद घेता येत नव्हता. माझ्या शरिरात हार्मोनल इम्बॅलन्स होत होता त्यामुळे काही कळत नव्हतं. मी ५ तास तिच्याशिवाय कशी राहू हीच काळजी वाटत होती. तेव्हा मला कळलं आईपण काय असतं. पण, आपलं बाळच आपल्याला ताकद देतं की आई तू काम करत रहा. त्या दिवशी माझी लेक ५ तास उपाशी राहिली. आई-बाबांनी तिला फॉर्म्युला मिल्क द्यायचा प्रयत्न केला. पण, तिने ते घेतलं नाही", असं सावनी म्हणाली.

पुढे ती म्हणाली, "आई-बाबांनी आमचा एक फोटो क्लिक केला होता. ज्यात मी टीव्हीवर राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारतीये आणि आई-बाबा तिला टीव्हीमध्ये तिला दाखवत होते की, बघ तुझी आई पुरस्कार घेतीये. मी पुरस्कार घेतला आणि तिथल्या काही लोकांनी मला मुलाखतीसाठी बाजूला नेलं. तेव्हा मी त्यांना म्हटलं की प्लीज मला हॉटेलला जाऊ देत. तेव्हा माझ्या आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. एकीकडे माझं २ महिन्यांचं बाळ  आणि दुसरीकडे दुसरीकडे नॅशनल टेलिव्हिजनवर माझी मुलाखत होणार होती. त्यावेळी नवऱ्याने मला धीर दिला आणि मी कशीबशी ती मुलाखत पूर्ण केली. या सगळ्यात ५ तासांपेक्षा जास्त वेळ होऊन गेला होता. पण, माझ्या लेकीने जराही त्रास दिला नाही. हॉटेलवर गेल्या गेल्या मी तिला कवेत घेतलं, तिला दूध पाजलं. मात्र, या सगळ्यात माझ्या लेकीने मला खूप ताकद दिली."

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटी