'गुलाबी साडी' हे 2024 मधील सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या गाण्यांपैकी एक आहे.संजू राठोड (Sanju Rathod)ने गायलेलं गाणं हे प्रचंड गाजलं आहे. लग्न असो वा ट्रेंडिंग रील, सगळीकडे या गाण्याचीच चर्चा सुरू आहे . सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांमध्ये या गाण्याची क्रेझच पाहायला मिळतेय. अशातच आता या गाण्याचं भोजपुरी व्हर्जन व्हायरल होत आहे. या भोजपुरी व्हर्जनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
धीरज चौबेनं इंस्टाग्रामवर 'गुलाबी साडी' या मराठी गाण्याचं भोजपुरी व्हर्जन शेअर केलं आहे. या व्हिडीओमध्ये तो 'गुलाबी साडी' हे गाणं भोजपुरीमध्ये गाताना पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी मराठी गाण्याला सर्वोत्कृष्ट म्हटलं आहे. तर काहीजणांना भोजपुरी व्हर्जन प्रचंड आवडलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'गुलाबी साडी आणि लाली लाल लाल' हे गाणं तुफान ट्रेंड होतंय. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या गाण्यावर व्हिडीओ शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या गाण्याची भूरळ बॉलिवूड कलाकारांनाही पडली. 'यूट्यूब'वरील जागतिक स्तरावरच्या उच्चांक गाठणाऱ्या व्हिडीओंमध्ये आणि 'स्पॉटीफाय'च्या जागतिक व्हायरल गाण्यांमध्ये 'गुलाबी साडी' गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. फक्त ऐवढचं नाही तर न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवरही हे गाणं झळकलं आहे.
गायक संजू राठोडचा सिनेसृष्टीतील प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. कुठलाही वारसा नसताना कला कौशल्याने तसेच स्वबळावर त्यानं सिनेसृष्टीत आपलं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. संजूने आजवर अनेक दमदार गाणी गायली आहेत. यामध्ये 'नऊवारी पाहिजे', 'बाप्पावाला गाणं', 'बुलेटवाली', 'गुलाबी साडी' यांचा समावेश आहे. संजू राठोड हा जळगाव येथील धानवड या छोट्याशा तांडातला मुलगा आहे.