सोशल मीडिया हे सध्याच्या काळातलं प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे दूरवर असलेली माणसंही या माध्यमामुळे सहज जोडी गेली आहेत. इतकंच नाही तर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या माध्यमातून अनोळखी माणसं सुद्धा सहज जोडी जात आहेत. एकमेकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली की ही मैत्री करणं सहज सोपं होतं. त्यामुळे गेल्या काही या फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवण्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे. परंतु, एखादी अनोळखी 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' तुमचं आमचं आयुष्यही बदलू शकते.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका फ्रेन्ड रिक्वेस्टची चर्चा रंगली आहे. मात्र, ही फ्रेंड रिक्वेस्ट सोशल मीडियाशी निगडीत नसून चक्क रंगभूमीशी संबंधित आहे. रंगभूमीवर येणारे ‘सवाईगंधर्व’, ‘जमदग्नीवत्स’ आणि 'व्यास क्रिएशन्स' या तीन संस्थांची निर्मिती असणारे ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटक सध्या चर्चेत आहे.
चौघांचं आयुष्य एका 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' ने कसं बदलत जातं हे या नाटकात दाखवण्यात आलं आहे. 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' हे सस्पेन्स, इमोशनल, कॉमिक अशा विविध मिश्रणाचं नाटक आहे. या नाटकात आशिष पवार, प्रियांका तेंडोलकर, अतुल महाजन आणि अजय पुरकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
दरम्यान, प्रसाद दाणी लिखित या नाटकाचं दिग्दर्शन कुमार सोहोनी यांनी केलं असून त्याची निर्मिती अभिनेता अजय पुरकर, आकाश भडसावळे, शैलेश देशपांडे, वैशाली गायकवाड यांनी केली आहे. या नाटकाचा शुभारंभ येत्या २५ जानेवारीला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी ५.०० वाजता येथे होणार आहे.