नवीन वर्षात सर्वकाही सुरळीतपणे सुरू होईल अशी आशा जनतेने ठेवली होती, पण सुरुवातीचे काही महिने गेल्यावर पुन्हा लॉकडाऊन लागला आणि इतिहासाची पुनरावृत्ती असे म्हणावे लागेल. गेल्या वर्षी जी कोरोनाची लाट आली ती गंभीर होतीच पण आता ही दुसरी लाट महाभयंकर आहे आणि हे आपण सर्वजण पाहतोय. असं असूनही काही ठिकाणी गर्दी आणि मास्क हनुवटीच्या खाली आहेच. लोकांना त्यांच्या पद्धतीनेच समजावून सांगण्यासाठी 'कडक एण्टरटेमेंट' घेऊन आले आहे 'बेला चाओ'चं कडक मराठी व्हर्जन'.
स्वप्निल संजय मुनोत आणि अक्षय मुनोत यांच्या 'अहमदनगर फिल्म कंपनी'ची निर्मिती असलेलं 'Bella Ciao चं कडक मराठी व्हर्जन' कसाला पडता बाहेर या गाण्याची कल्पना नितिश कटारिया आणि स्वप्निल मुनोत यांची आहे. "हल्ली काही लोकांना गोष्टी, परिस्थिती फिल्मी पद्धतीने समजवून सांगितल्यावर त्या जास्त लवकर समजतात असं एक माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. एक चांगला संदेश समाजात पोहचावा, त्या गाण्यातून लोकांनी बोध घ्यावा, सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती पाऊलं उचलावी, स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्यावी हे सांगण्या मागचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आमचं हे 'Bella Ciao चं कडक मराठी व्हर्जन'. कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट पाहिली आणि आता 'बस्स, पुरे!' असं झालंय. त्यात तिसरी लाट येण्याची पण शक्यता वर्तवली जात आहे, हे सगळं आपण थांबवू शकतो फक्त मूलभूत काळजी घेऊन. त्यामुळे या गाण्याच्या मार्फत मी सर्वांना एकच विनंती करतो की, कृपया मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझर वापरा आणि गरज असल्याशिवाय बाहेर जाणं टाळा."
कडक एंटरटेमेंट, नरेंद्र फिरोदिया, मयुरी स्वप्निल मुनोत आणि श्रुती अक्षय मुनोत हे या गाण्याचे प्रस्तुतकर्ते आहेत. तसेच, गाण्याचं दिग्दर्शन संदीप दंडवते यांनी केले असून गाण्याचे बोल अतिश हरेल आणि संजा यांनी लिहिले आहे. वोकल आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निरंजन पेडगांवकर यांनी सांभाळली आहे. कडक मराठीच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरांत पोहचलेले कलाकार महेश काळे, लहुकुमार चोभे, वैभव कुऱ्हाडे, तेजस अंधाळे, कन्हैया तिवारी, रोहित पोफाळे यांनी या गाण्यात अभिनय केला आहे.