किरकोळ शरीरयष्टी आणि अंगविक्षेपातून साकारलेल्या अभिनयाच्या बळावर गेली ६० वर्ष नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत मुशाफिरी करणारे बुजुर्ग अभिनेते राजा मयेकर यांचं आज मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. लोकनाट्याचा राजा असा किताब मिळवणाऱ्या राजा मयेकरांनी विनोदाची पातळी घसरू न देता अस्सल विनोदाची गेली कित्येक वर्ष आपल्या अभिनयातून रसिकांना मनमुराद हसवलं. कामगार रंगभूमीपासून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला.
राजा मयेकरांचा लालबागला त्यांचा स्वताचा कलाकार फोटो स्टुडिओ होता. राजा मयेकरांना एक कलाकार म्हणून खरी ओळख मिळाली ती शाहिर साबळे आणि पार्टीमध्ये केलेल्या लोकनाट्यांमधील भूमिकांमधून. त्यांनी काम केलेल्या आंधळं दळतंय, यमराज्यात एक रात्र , असूनी खास घरचा मालक,बापाचा बाप, नशीब फुटकं सांधून घ्या, कोयना स्वयंवर या नाटकांना तुफान प्रतिसाद मिळाला. यानंतर त्यांचा मोर्चा व्यावसायिक नाटकांकडे वळला.
गुंतता हृदय हे, सूर राहू दे ,गहिरे रंग, श्यामची आई ,धांदलीत धांदल ,भावबंधन,एकच प्याला,संशयकल्लोळ,बेबंदशाही,झुंझारराव ही त्यांची गाजलेली नाटकं. तसेच धाकटी बहिण,स्वयंवर झाले सीतेचे ,कळत -नकळत, या सुखांनो या, झंझावात,लढाई, धम्माल गोष्ट नाम्याची हे त्यांनी भूमिका केलेले काही गाजलेले सिनेमे. गुंतता हृदय हे नाटकातील सोमजी मास्तर ही त्यांची अतिशय गाजलेली भूमिका.. राजा मयेकरांनी दूरदर्शनवरील हास परिहास,गजरा ,श्रध्दा, असे पाहुणे येती या कार्यक्रमातही महत्वाच्या भूमिका केल्या होत्या.