लॉकडाउनमध्ये मराठी सिनेइंडस्ट्रीतील बरेच कलाकार लग्नबेडीत अडकले. या कलाकारांमध्ये ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते संगीतकार आनंद ओकसोबत ११ जुलै २०२० रोजी लग्नबेडीत अडकली. लॉकडाउनदरम्यान सिनेइंडस्ट्रीतील कामांचाही वेग मंदावला असून काहींची कामेदेखील ठप्प झाली आहेत. अशा परिस्थितीत शुभांगी आणि आनंदने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे त्या दोघांनी हा निर्णय आर्थिक टंचाईमुळे नाही तर केवळ एक आवड आणि हाताला काम मिळावे या हेतूने घेतला असल्याचे म्हटले आहे.
शुभांगी सदावर्ते हिने श्रीपाद फूड्स न्याहारी या नावाने या नाश्ता सेंटरची सुरुवात केली आहे. याबाबत ती सांगते की, श्रीपाद फूड्स ‘न्याहारी’ या आमच्या नाश्ता सेंटरची सुरुवात झाली. मुळात आम्ही नवरा बायको दोघेही कलाकार आहोत.
आमचे लग्न लॉकडाउनमध्ये पार पडले. कामे ठप्प पडली. घरगुती लाडू, पिठे आणि चटण्या घरपोच देण्याचा छोटेखानी व्यवसाय सुरु केला. श्रीपाद फूड्स या नावाने उत्तम प्रतिसाद मिळाला. मग गणपतीत चॉकलेट मोदकांना मागणी आली. नंतर दिवाळी फराळालाही ग्राहकांनी पसंती दिली.
दिवाळीतच शुभांगीच्या मनात नाश्ता सेंटरची कल्पना आली होती. त्यानंतर अखेर तिने नुकताच त्याचा श्रीगणेशादेखील केला. मुळात सांगण्याची गोष्ट म्हणजे आमच्यावर हे करण्याची वेळ वगैरे आली असे नसून आम्ही दोघे आमच्या आनंदासाठी हा व्यवसाय करत आहोत. कलाकार म्हणून आमच्या दोघांची कामं सांभाळून आम्ही हे करणार आहोत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या, असे ती म्हणाली.