नव्वदच्या दशकातील मराठमोळी अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. अभिनेत्रीसोबत त्या एक उत्तम नृत्यांगना आहे. अर्चना यांनी मराठी, हिंदी तसेच उडिया भाषेतील चित्रपटात अभिनय करून सिनेइंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे.
अर्चना जोगळेकर यांचा १९६५ साली एका मराठी कुटुंबात जन्म झाला. आता त्या ५६ वर्षांची असूनही खूप सुंदर दिसते. त्या अभिनेत्रीसोबत एक कथ्थक नृत्यांगना आणि कोरिओग्राफरसुद्धा आहे. त्यांनी आपली आई आशा जोगळेकर यांच्याकडून कथ्थकचे धडे गिरविले आहेत.
आशा जोगळेकर यांनी १९६३ साली अर्चना नृत्यालय या नावाने एक नृत्य शाळा सुद्धा सुरू केली होती. त्यानंतर अर्चना यांनी स्वतः १९९९ मध्ये ‘न्यू-जर्सी’ याठिकाणी या नृत्य शाळेची एक शाखा सुरू केली आहे.
अर्चना जोगळेकर आणि अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्या ‘एकापेक्षा एक’ या चित्रपटातील ‘ये जिवलगा’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. तू तेव्हा तशी या गाण्यामुळेही अर्चना यांची ओळख रसिकवर्गाला आहे. त्यानंतर मात्र अर्चना लग्न करून परदेशात स्थायिक झाल्या.
चित्रपटांबरोबरच अर्चना यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. ‘चुनौती’, ‘कर्मभूमि’, ‘फूलवंती’, ‘किस्सा शांति का’, ‘चाहत और नफरत’ या हिंदी मालिकेत त्यांनी काम केले आहे.