Join us

पारख नात्यांची लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 4:31 AM

नातं..मग ते कोणतंही असो आपल्या आयुष्यात एकदा तरी त्या नात्याची पारख होते असा प्रसंग नक्कीच येतो. मग तेव्हा आपल्याला ...

नातं..मग ते कोणतंही असो आपल्या आयुष्यात एकदा तरी त्या नात्याची पारख होते असा प्रसंग नक्कीच येतो. मग तेव्हा आपल्याला त्या नात्याची खरी ओळख होते. असाच काही आशय असणारा फायनल रेंडर प्रस्तुत, प्रकाश जैन निर्मित पारख नात्यांची मराठी चित्रपट येत्या २० एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सिनेमात मिलिंद गवळी, निशा परुळेकर, सिया पाटील, अनिकेत केळकर, प्रदीप वेलणकर, प्रफुल सावंत, मुग्धा शहा, स्मृती पारकर, आणि मिलिंद शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथा प्रकाश वैद्य यांची असून पटकथा योगेश गवस, विराट भट यांची आहे तर दिग्दर्शन मुकेश मिस्त्री यांनी केले आहे. गीतकार मंदार चोळकर तर संगीत विवेक अस्थाना यांचे आहे.मिलिंद गवळी, सिनेमाबद्दल सांगतात की, सिनेमाचे नाव जरी पारख नात्यांची असं असलं तरी हा सिनेमा म्हणजे सस्पेंस थ्रिलर आणि फॅमिली ड्रामा आहे. यात मी मस्त कलंदर अशा नायकाच्या भूमिकेत आहे. गावातील त्याच्या प्रेयसीचे (निशा परुळेकर) एक आगळे वेगळे आव्हान तो स्विकारतो. ते म्हणजे गावातील एक जुना वाडा निशाचे वडील विकत घेणार असतात, परंतु गावातील काही लोकं सांगतात कि या वाड्यात भूत आहे. त्या वाड्यात भूत नाही हे सिद्ध करण्यासाठी मी त्या वाड्यात एक रात्र मुक्काम करण्याचे ठरवतो.. त्याप्रमाणे मी तिथे रात्रही काढतो पण त्या रात्री तिथे बरंच काही घडतं. ते काय घडतं? त्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल.निशा परुळेकर सांगते कि, हा सिनेमा म्हणजे नात्यांची परीक्षा आहे. जेव्हा एखादं नातं जोडलं जातं तेव्हा त्याला एखाद्या बिकट प्रसंगातून सामोरे जात सिद्ध व्हावं लागतं. अगदी तसंच काहीसं कथानक या सिनेमाचं आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर हा सिनेमा म्हणजे नात्यांचा खेळ आहे. जो आपण आपल्या वास्तविक आयुष्यात नेहमीच खेळत असतो. मिलिंद शिंदे खलनायकाच्या भूमिकेत आहे. जो गावात राहून गावातल्या शेतकऱ्यांचे शोषण करतो अशी त्यांची भूमिका आहे.