#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 9:35 AM
गेल्या आठवड्याभरात कास्टिंग काऊचवर देशभरात मोठी चर्चा रंगतेय. बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान कास्टिंग काऊचबाबत विधानं करुन वादाच्या भोव-यात ...
गेल्या आठवड्याभरात कास्टिंग काऊचवर देशभरात मोठी चर्चा रंगतेय. बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान कास्टिंग काऊचबाबत विधानं करुन वादाच्या भोव-यात अडकल्यात.आता मराठमोळी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव हिने याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. आपल्यालाही कास्टिंग काऊचची ऑफर देण्यात आली आणि आपला विनयभंग झाला होता अशी कबुली उषाने एका माहितीपटात दिल्याचे वृत्त मिड-डेने प्रसिद्ध केले आहे. चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच आणि तेही प्रस्थापितांकडून ही गोष्ट सामान्य असल्याचे उषाने म्हटले आहे. मात्र उषालाही संधीच्या मोबदल्यात काय देऊ शकते अशी विचारणा करण्यात आली होती. यावर आपल्याकडे पैसे नसल्याचे तिने सांगितले.यावर पैसे नकोत,मात्र जर निर्माता दिग्दर्शक यापैकी जर कुणाला तुझ्यासोबत झोपायचं असेन तर अशी विचारणा झाल्याचा गौप्यस्फोटसुद्धा उषाने केला आहे. झगमगत्या दुनियेत म्हणजेच सिनेमात काम करण्यासाठी घर सोडून मायानगरी मुंबई गाठली. मात्र इथे कास्टिंग एजंटकडून अनेकदा लैंगिक शोषण झाल्याची कबुली उषाने दिली आहे. “एक अभिनेत्री म्हणून तुला शक्य तेव्हा आनंदाने लैगिंक संबंध ठेवावे लागतील. तो बोलता बोलता त्याला हवं तिथं स्पर्श करत होता, किस करत होता” असंही उषाने म्हटले आहे. त्या धक्क्याने स्तब्ध झाले तिने पुढे सांगितले. त्याला रोखण्याचाही प्रयत्न केल्याचे उषाने स्पष्ट केले आहे. मात्र काम आणि संधी हवी की नको असा उलटसवाल त्याने केल्याचे तिने नमूद केले आहे. शिवाय तुझा अॅटिट्यूड योग्य नसल्याचा शेराही त्याने मारला असं उषाने म्हटले आहे. कास्टिंग काऊचवर बनणा-या एका माहितीपटात उषाने हे धक्कादायक वास्तव समोर आणल्याचे वृत्त मिडडेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलंय. उषा जाधव ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठमोळी अभिनेत्री आहे. आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात तिने नाटकातून केली होती. 2012 प्रदर्शित झालेला 'धग' सिनेमा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. या सिनेमानंतर अनेकांनी तिची तुलना थेट स्मिता पाटील यांच्याशी केली. मराठी नाटक, सिनेमासह उषा जाधवने हिंदीतही आपला ठसा उमटवला. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या 'ट्रॅफिक सिग्नल'मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. 2012 मध्ये ती महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'कौन बनेगा करोडपती'च्या जाहिरातीतही झळकली होती. याशिवाय स्टार प्लसवरील 'लाखो में एक' या कार्यक्रमात उषाने काम केलं आहे. (Also Read:नेहाने केला कास्टींग काऊचचा सामना)