आपल्या मंत्रमुग्ध गाण्यांनी श्रोत्यांच्या कानाला गारवा देणारे सुप्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे आता वेगळ्या भूमिकेत आपल्या समोर येणार आहेत. लाखो श्रोत्यांच्या कानांना आपल्या गाण्याने त्यांनी आजवर तृप्त केले. आता ते लाखो खवय्यांच्या जिभेला तृप्त करणार आहेत. “गवय्या ते खवय्या” या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली पाककला ते सादर करणार आहेत. मिलिंद इंगळे हे उत्तम बल्लव आहेत हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे.
वेगवेगळ्या पाककृती ते आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब चॅनलद्वारे सादर करणार आहेत. आपल्या गाण्यांनी लाखो लोकांच्या मनात प्रेमाचे स्थान पटकावलेला हा गायक आता आपल्या पाककृतींनी देखील तसंच प्रेम मिळवण्यास सिद्ध आहे. १ जुलै पासून मिलिंद इंगळेंच्या युट्यूब चॅनलवरुन आणि त्यांचा सोशल मिडियाच्या माध्यमातून खवय्यांना विविध रेसिपींची चव चाखायला मिळणार आहे.
‘गवय्या ते खवय्या’ हा फक्त पाककृती कार्यक्रम नसून यामध्ये मिलिंद इंगळे पाककृती दाखविण्यासोबतच वेगवेगळी गाणी देखील ऐकवणार आहेत. त्या गाण्यांमागचे किस्से ऐकवणार आहेत. तर कधी एखाद्या भागामध्ये एखादा सेलिब्रिटी येऊन त्याचा आवडता पदार्थ तयार करुन दाखवेल. रसिक प्रेक्षकांना, चाहत्यांना देखील त्यांच्या स्पेशल पाककृती करुन दाखविण्यासाठी निमंत्रित केले जाईल. वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबतदेखील हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
१९९८ मध्ये मिलिंद इंगळेंच्या गारवा गाण्याने अवघ्या मराठी श्रोत्यांना बेधुंद केले होते. त्याचवेळी त्यांचं ‘छुई मुई सी तुम लगती हो’ हे गाणं तर त्या वर्षीचं ब्लॉकब्लस्टर ठरलं होतं. तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलंसं गाव, गारवा, सांज गारवा, ये है प्रेम आदी त्यांचे अल्बम संगीत क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहेत. एकूणच गाणं आणि खाणं असा दोहोंचा मेळ साधणाऱ्या मिलिंद इंगळेंच्या ‘गवय्या ते खवय्या’ या कार्यक्रमाची आतुरता सर्वांनाच लागली आहे.