Join us

मराठमोळ्या मिताली मयेकरचं 'हॅशटॅग प्रेम', येणार या दिवशी भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 7:00 AM

मिताली मयेकरच्या 'हॅशटॅग प्रेम'ची होतेय चर्चा

प्रेमाचा मूळ रंग गुलाबी असला तरी त्याच्या अनेक छटा आजवर प्रत्येकानं आपापल्या परीनं अनुभवल्या आहेत. काळानुरूप प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती बदलल्या असल्या तरी मूळ प्रेमभावना आजही तिच आहे. आजचा आधुनिक काळही यात बदल घडवू शकलेला नाही. तरुणाईला जी भाषा समजते आणि जी लँग्वेज इझी वाटते त्या भाषेत आज प्रेम व्यक्त केलं जात आहे. याच कारणामुळं प्रेमकथांवर आधारित चित्रपटांची टायटल्सही त्याच रंगात रंगल्याची पहायला मिळतात. 'हॅशटॅग प्रेम' हा आगामी बहुचर्चित मराठी चित्रपट याचीच अनुभूती देणारा आहे. कोरोना आणि लॅाकडाऊनमुळं लांबणीवर गेलेला 'हॅशटॅग प्रेम' १७ डिसेंबर २०२१ रोजी रिलीज होणार आहे.

 निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली 'हॅशटॅग प्रेम'ची निर्मिती केली असून, वितरक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या सहयोगानं पिकल एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून हा चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचणार आहे. अरविंद गोविंद पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. खरं तर हा चित्रपट अगोदर १९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, पण लॅाकडाऊन लागलं आणि सगळीच गणितं बदलली. आता पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून आकाशाकडे झेपावत 'हॅशटॅग प्रेम' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. राजेश बाळकृष्ण जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

मिताली मयेकर आणि सुयश टिळक फ्रेश जोडी भेटीला

मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही नवी कोरी जोडी आणि त्यांची केमिस्ट्री या चित्रपटाचं सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र असून, रसिकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्यासाठी पुरेशी ठरणार आहे. 'हॅशटॅग प्रेम'च्या ट्रेलरमध्ये मिताली-सुयश या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांनी अनुभवली आहे. आता चित्रपटात ही जोडी कशा प्रकारे धमाल करते हे पाहण्यासाठी प्रेक्षकांसोबतच मराठी सिनेसृष्टीही आतुरली आहे. 

या सिनेमाची कथा-पटकथा निखिल कटारे यांनी लिहिली आहे. डीओपी राजा फडतरे यांची अफलातून सिनेमॅटोग्राफी रसिकांना भुरळ पाडणारी आहे. गीतकार संजाली रोडे आणि कौतुक शिरोडकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार प्रविण कुवर यांनी संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी गायक-संगीतकार रोहित राऊतनं सांभाळली आहे. कला दिग्दर्शन केशव ठाकूर यांनी केलं असून, महेश भारंबे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

टॅग्स :मिताली मयेकरसुयश टिळक